पुणे : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी मोठ्या गदारोळात झाली. विरोधकांनी सभेत विविध प्रश्न उपस्थित करत घोषणाबाजी केली. सभासदांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी प्रत्त्युत्तर दिले. कर्ज, कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया आणि मागील कामकाजावरून सभासदांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावरून दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी झाली. सभेचे कामकाज संपल्यानंतर विरोधी गटाने सभास्थळीच स्वतंत्र प्रतिसभा घेतली. कारखाना सुरू करण्यासाठी आमचा पाठिंबा असून, राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन महेश ढमढेरे यांनी केले.
कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दिवंगत संचालक व सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेच्या प्रारंभी काही सभासदांनी गोंधळ घातला. संतप्त सभासदांना महेश ढमढेरे व श्रीनिवास घाडगे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. प्रभारी कार्यकारी संचालक विकास पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. त्यानंतर काकासाहेब खळदकर, सुधीर फराटे, अॅड. सुरेश पलांडे यांच्यासह सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित केले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच माजी कृषिमंत्री शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी कारखान्याला कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत शब्द दिला आहे. त्यामुळे आम्ही सकारात्मक आहोत. ‘एनसीडीसी’कडे प्रलंबित असलेल्या कर्जाच्या प्रस्तावात भाजपबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित काही कारखानेही आहेत. त्यामुळे लवकरच ‘एनसीडीसी’चे कर्ज उपलब्ध होईल. प्रतिसभेवेळी श्रीनिवास घाडगे, दादा पाटील फराटे, आबासाहेब गव्हाणे, बाळासाहेब घाडगे, शशिकांत दसगुडे, काकासाहेब खळदकर आदींनी भूमिका मांडल्या.


















