आर्थिक संकटातून ‘गणेश’ला बाहेर काढले; आता डिस्टलरी पूर्ण क्षमतेने सुरू करणार : आ. विवेक कोल्हे

अहिल्यानगर : श्री गणेश सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला, त्यावेळी कारखान्यावर ८० कोटी रुपयांहून अधिक कर्जासह शासकीय व संचित देण्यांचे मोठे आव्हान होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून जिल्हा बँक तसेच एनसीडीसीअंतर्गत निधी उपलब्ध झाल्याने कारखान्याच्या आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत झाली. त्यातून कारखान्याचा विस्तार तसेच थकीत देणी भागविणे शक्य झाले. आता डिस्टलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असून, कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस श्री गणेश कारखान्यालाच द्यावा, असे आवाहन आमदार विवेक कोल्हे यांनी केले.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, माजी संचालक गंगाधर चौधरी, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, शितलताई लहारे, अ‍ॅड. पंकज लोंढे, शरद थोरात, कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे, संगमनेरचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सचिव नितीन भोसले यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

आमदार विवेक कोल्हे म्हणाले की, राज्यातील साखर उद्योग सध्या विविध आर्थिक संकटांना सामोरा जात आहे. ऊसतोडणी मजुरांना देण्यात आलेल्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या आगाऊ रकमेची वसुली करणे हे मोठे आव्हान आहे. यामध्ये कायदेशीर अडचणीही आहेत. गेल्या पाच वर्षांत राज्यातील जवळपास ३७ साखर कारखाने अवसायनात गेले असून, ७० हून अधिक कारखाने आर्थिक अडचणीत आहेत.

काही मोठ्या क्षमतेच्या कारखान्यांवर पूर्वीचे कर्ज असतानाही त्यांनी पुन्हा दीडशे कोटी रुपयांहून अधिक कर्जाची मागणी केली आहे. एनसीडीसीअंतर्गत राज्यातील साखर कारखान्यांना सुमारे ५,५०० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे अनेक कारखान्यांना कर्जाचा डोंगर उभा करून सहकार क्षेत्र चालवावे लागत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासन निश्चितपणे प्रयत्न करेल, असा विश्वासही कोल्हे यांनी व्यक्त केला.

विभागीय क्लस्टरसाठी प्रयत्न : कोल्हे

केंद्र सरकार व केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी साखर उद्योगासंदर्भात प्रेझेंटेशन देण्यासाठी आपल्याला बोलावले होते. त्यानंतर कोल्हापूर येथे विभागीय क्लस्टरला मंजुरी मिळाली. सोलापूरप्रमाणेच आपल्या भागातही एक विभागीय क्लस्टर मंजूर व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्व. शंकरराव कोल्हे यांनी उभारलेल्या कार्यकर्त्यांची फळी आणि त्यांची ताकद पाठीशी असल्यामुळे गणेश कारखान्याला अडचणींतून पुढे नेत असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले.

ऊस लागवड आणि उत्पादन वाढवा : थोरात

गणेश कारखाना टिकवायचा असेल तर ऊस लागवड आणि उत्पादन वाढले पाहिजे. आपल्या शेतातील ऊस गणेश कारखान्यालाच गेला पाहिजे, हे प्रत्येक शेतकऱ्याने उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

राज्यातील तसेच जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने सध्या आर्थिक अडचणींच्या परिस्थितीतून जात आहेत. अशा परिस्थितीतही मार्ग काढावा लागतो. गणेश कारखान्याने आगामी गळीत हंगामासाठी चांगली तयारी केली आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने पावसाअभावी उसाचे टनेज कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभासदांनी गणेश कारखान्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. कारखाना सुरळीत चालावा आणि आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी आपण आणि आमदार विवेक कोल्हे कटिबद्ध असल्याचे थोरात यांनी सांगितले.

गणेशच्या सभासदांची दिवाळी गोड

येत्या दिवाळीत सभासदांना साखर वाटप करण्यात येणार असून, कामगारांचीही दिवाळी गोड करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांचे प्रतिटन २८८ रुपयांप्रमाणे पैसे बाकी होते, त्यांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. आता सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती आमदार विवेक कोल्हे यांनी दिली.

यावेळी महेंद्र गोर्डे, बाळासाहेब चोळके, ज्ञानदेव चोळके, मधुकर सातव, अनिल गाढवे, विष्णुपंत शेळके, आलेश कापसे, सौ. फोपसे, अरविंद फोपसे, बलराज धनवटे, संपतराव चौधरी, माजी संचालक आप्पासाहेब बोठे, रघुनाथ गाडेकर, भाऊसाहेब चौधरी, संजय शेळके, संपतराव लहारे, अनिल शेळके, बी. एल. आहेर आदी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here