‘सह्याद्री’वर तिरकी नजर ठेवू नका; टीकाकारांना योग्य वेळी उत्तर देऊ : चेअरमन बाळासाहेब पाटील

सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधकांना प्रश्नांची उत्तरे ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती. कारखान्यावर टीका करणे हाच त्यांचा एकमेव उद्देश होता. अरेरावीची भाषा करणे ही आमची संस्कृती नाही. मात्र, सभासद शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या विश्वासाच्या बळावर ‘सह्याद्री’ भक्कमपणे उभा आहे. त्यामुळे या कारखान्याकडे कोणीही तिरक्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करू नये. प्रतिसभा घेऊन प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर दिले जाईल, असा इशारा माजी मंत्री तथा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिला.

यशवंतनगर (ता. कराड) येथे सन २०२६-२७ गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यात ते बोलत होते. संचालक राजेंद्र पाटील आणि मनीषा पाटील यांच्या हस्ते बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी राज्य लेखा परिषदेचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, उपाध्यक्ष कांतीलाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्या संगीता साळुंखे, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, प्रणव ताटे, कोरेगावचे उपसभापती रवींद्र पवार, अजितराव पाटील चिखलीकर आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

बाळासाहेब पाटील म्हणाले की, सहकारी साखर कारखाना असल्याने कारखान्याच्या कामकाजातील सर्व बाबी अहवालाच्या माध्यमातून सभासदांसमोर मांडल्या जातात. त्यामुळे कारखान्याच्या कारभाराबाबत सभासदांना माहिती उपलब्ध होते. मात्र, टीका करताना केवळ सह्याद्रीकडे न पाहता इतर साखर कारखान्यांची कर्जस्थिती आणि उत्पादन खर्चाचीही तुलना केली पाहिजे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कारखान्याचा उत्पादन खर्च कमी करण्यात यश आले आहे. ही संस्था सभासदांचीच आहे. त्यामुळे घरातील कारभाऱ्याला ज्या पद्धतीने सहकार्य केले जाते, त्याच भावनेने सभासदांनी सह्याद्रीच्या वाटचालीला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

साखर उद्योगाच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यावे

एमएसपी दरवाढ, इथेनॉलच्या दरातील वाढ तसेच साखर उद्योगासमोरील इतर प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले.मोठ्या संस्थेची उभारणी आणि विस्तार करताना कर्ज घेणे अपरिहार्य असते. ज्या पद्धतीने घरातील मोठ्या कामासाठी कर्ज घ्यावे लागते, त्याचप्रमाणे कारखान्याच्या विस्तारासाठीही कर्ज घेणे आवश्यक ठरते. त्यापैकी ८३ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

२२०० प्रकरणांपैकी १३०० वारस नोंदी पूर्ण

कारखान्याशी संबंधित वारस नोंदींच्या प्रश्नावरही बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली. सुमारे २२०० प्रकरणांपैकी १३०० वारस नोंदी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित काही प्रकरणे कौटुंबिक तक्रारींमुळे प्रलंबित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री कारखान्याचा कारभार, आर्थिक स्थिती आणि विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here