पुणे : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी पवार गटांसह भाजप-शिवसेनेचीही मोर्चेबांधणी

पुणे : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनेलसमोर युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘शेतकरी पॅनेल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. युगेंद्र पवार यांनी सोमेश्वर कारखान्याची निवडणूक स्वतंत्र पॅनेलच्या माध्यमातून लढविण्याची घोषणा केल्यानंतर बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी मंगळवारी (दि. २२) निंबुत येथे कार्यकर्ते व सभासदांचा मेळावा आयोजित केला असून, या बैठकीत स्वतंत्र पॅनेल उभे करायचे की अन्य गटासोबत युती करायची, यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे सभासदांचे लक्ष दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांकडे आणि त्यांच्या प्रचाराच्या रणनीतीकडे लागले आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर, बारामतीच्या राजकारणात ही पहिलीच महत्त्वाची सहकारातील निवडणूक होत आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने घडणाऱ्या राजकीय घडामोडींचे तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. कारखान्याची निवडणूक स्थानिक राजकारणासाठीही महत्त्वाची ठरणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वीच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सहयोग निवासस्थानी नुकत्याच इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेत चर्चा केली. तर प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती २३ आणि २४ सप्टेंबर रोजी होणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. युगेंद्र पवार यांनी बिनविरोध निवडणुकीबाबत अंतिम निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरेल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here