सोलापूर : विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना तांत्रिक अन् आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत – अग्निहोत्री

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या २६वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे विभागीय संचालक गिरीराज अग्निहोत्री यांच्या हस्ते झाला. साखर कारखान्याचे संचालक रणजितसिंह शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात संचालक राजेंद्र खोत अन् त्यांच्या पत्नी शारदाताई खोत यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा, तर उपाध्यक्ष पोपट गायकवाड यांच्या हस्ते कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विठ्ठलराव शिंदे कारखाना शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. नव तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कारखाना तांत्रिक अन् आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे विभागीय संचालक अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.

कारखान्याचे संचालक रणजितसिंह शिंदे यांनी साखर कारखान्यासाठी आगामी हंगाम पावसाअभावी अडचणीचा ठरत आहे. कारखान्याने दर दहा दिवसांनी पेमेंट केले आहे. त्यामुळे सभासदांनी इतरत्र ऊस न देता वेळेत पेमेंट देणाऱ्या विठ्ठलराव शिंदे कारखान्यास ऊस पुरवठा करावा, असे आवाहन केले. राष्ट्रीय सहकारी विकास निगमने कारखान्याच्या विकासासाठी शासनाची हमी न घेता कारखान्याचा कारभार पाहून सातत्याने मदत केली आहे असेही ते म्हणाले. कार्यक्रमास उपाध्यक्ष पोपट गायकवाड, तुकाराम ढवळे, योगेश बोबडे, रमेश येवले पाटील, नागनाथ वाघ, वेताळा जाधव, राजाभाऊ थोरात, पांडुरंग घाडगे, अशोक मिस्कीन, दीपक पाटील, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, सर्व विभागप्रमुख, सभासद, पदाधिकारी उपस्थित होते. रविंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सचिन देशमुख यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here