पुणे:नवी दिल्लीच्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लि.च्यावतीने देण्यात येणारा हंगाम २०२५-२६ चा उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास देऊन सन्मानित करण्यात आले. मंगळवारी (दि. २२) नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, व्हाईस चेअरमन अशोक घोलप, कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक मंडळ सदस्य आणि अधिकारी वर्गाने स्वीकारला. कारखान्याने ऊस उत्पादकता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद घेऊन पुरस्कार मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.
पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर म्हणाले की, स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी कै. वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. स्व. निवृत्तीशेठ व स्व. सोपानशेठ शेरकर यांच्या शेतकरी हिताच्या आणि पारदर्शक कारभाराच्या विचारांवरच कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कमीत कमी वाफेचा वापर करून बगॅसची बचत केल्यामुळे आसवनी प्रकल्पाला याचा मोठा फायदा होत आहे. राष्ट्रीय पुरस्काराने विघ्नहरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारखान्यामार्फत ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना व्हीएसआय मांजरी बु. येथे स्वखर्चाने ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. प्रति एकरी १०० मेट्रिक टनांपेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना गौरवण्यात येते. गावोगावी शेतकरी मेळावे आयोजित केल्यामुळे प्रति एकरी ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असल्याचे शेरकर यांनी सांगितले.


















