अहिल्यानगर : देशातील पहिल्या बायो सीएनजी प्रकल्पाचा पाया संजीवनी उद्योग समुहाने रोखला. त्यावर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी आपणास दिल्लीत पाचारण करून त्याबाबतची पार्श्वभूमी समजून घेत केंद्रस्तरावर कंपनी स्थापन करून त्यातून साखर उद्योगाला मदत व्हावी, यासाठीचे पहिले क्लस्टर कोल्हापुर येथे उभारले जात असल्याचे सांगितले. त्याच धर्तीवरचे दुसरे क्लस्टर कोपरगावात उभारून त्यातून साखर उद्योगास मदत करावी, अशी अपेक्षा आमदार तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली. कारखान्याची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी कारखाना कार्यस्थळावर झाली. त्यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. सभास्थळी शेतीत आधुनिक तंत्राचा वापर, ऊस उत्पादन वाढीसाठी सुधारीत वाण, सेंद्रिय जैविक खते किटकनाशके, पोटॅश खत आदि माहितींचे केंद्र उभारण्यात आले होते.
आमदार कोल्हे म्हणाले की, कमी झालेले पर्जन्यमान, खरीपाचे नुकसान, दुष्काळ, एफआरपीच्या तुलनेत साखर विक्रीच्या एमएसपी दरात तर इथेनॉल सहवीज निर्मिती दरात न झालेली वाढ अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे साखर उद्योग जगविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने कोपरगावमध्ये क्लस्टर उद्योग सुरू करून त्यातून या उद्योगाला मदत करावी. प्रभारी कार्यकारी संचालक तुळशीराम कानवडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले, उपस्थित सभासद शेतकऱ्यांनी इतिवृत्तासह विषय पत्रिकेवरील सर्व एक ते तेरा विषय टाळ्यांच्या गजरात मंजुर केले. संजीवनी युनिट क्रमांक दोन कर्मवीर काकासाहेब वाघ रानवड साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मे.टन करण्याचा निर्णय घेवुन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी थेट बांधावर कृती कार्यक्रम घेत असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी दत्तात्रय कोल्हे, सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे, अरुणराव येवले, शिवाजीराव बारहाते, पांडुरंगशास्त्री शिंदे, शिवाजीराव वक्ते, त्रंबकराव परजणे, साहेबराव कदम, बाळासाहेब शेटे, दिपक गायकवाड, साहेबराव रोहोम, मच्छिंद्र केकाण उपस्थित होते. बाळासाहेब वक्ते यांनी सूत्रसंचालन केले. विलासराव माळी यांनी आभार मानले.


















