पुणे : श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर यशवंत बचाव कृती समिती व सभासदांनी पत्रकार परिषद घेऊन कारखान्याच्या कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. जमीन विक्री, थकीत देणी, मशिनरी व कारखाना सुरू करण्याच्या मुद्द्यांवरून ही वार्षिक सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. मागील सभांचे इतिवृत्त, ड्यू डिलिजन्स अहवाल, मशिनरी व कारखान्याच्या रेकॉर्डबाबतही समितीने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे सभेत सत्तारुढ संचालक मंडळ काय उत्तर देणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. वार्षिक सभेला पात्र सभासदांनाच प्रवेश दिला जाणार की विनासभासदांनाही प्रवेश मिळणार, याचीही चर्चा सुरू आहे.
यशवंत बचाव समितीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत विकास लवांडे यांनी कारखान्याची सुमारे ४९ एकर जमीन विक्रीबाबत प्रश्न उपस्थित करत यापुढे जमीन विकू देणार नसल्याची भूमिका मांडली. २००९-१० व २०१०-११ हंगामातील एफआरपी, ऊस बिले, व्याज, अनपेड रक्कम व विविध कपाती मिळून ऊस उत्पादक सभासदांची ५८ कोटी ६२ लाख ८७ हजार रुपयांची देणी प्रलंबित असल्याचे राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. सभासदनिहाय देणी निश्चित करून ती प्राधान्याने अदा करण्याची मागणी त्यांनी केली. माजी संचालक पांडुरंग काळे यांनी कारखान्याची निवडणूक घेण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगितले. निवडणूक झाली असती तर जमीन विक्रीची वेळ आली नसती, असा दावा त्यांनी केला.


















