सोलापूर : विठ्ठल कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा ३१ महिन्यांचा थकीत पगार देण्याची अध्यक्ष, आमदार अभिजित पाटील यांची ग्वाही

सोलापूर : येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कारखाना कार्यस्थळावर आज ४५ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजनाने शुभारंभ करण्यात आला. कारखाना बंद असताना ३१ महिने कामगारांचे पगार थकीत होते. कारखाना व कामगार संघटनेमध्ये झालेल्या करारानुसार हे थकीत पगार व इतर देणी अदा करण्यासाठी साखर आयुक्तांकडे भंगार विक्रीची परवानगी मागितली होती. त्या मागणीस आयुक्तालयाने मंजुरी दिली असून लवकरच ठरल्याप्रमाणे सर्व देणी अदा केली जातील, असे कारखान्याचे अध्यक्ष, आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले.

अध्यक्ष आमदार अभिजित पाटील यांनी आज झालेल्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. या गळीत हंगामापासून सर्व कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार १० टक्के पगार वाढ लागू करण्यात येणार आहे. तसेच दिवाळी सणानिमित्त सर्व कामगारांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मागील गळीत हंगाम २०२४-२५ साठी २५०० रुपये प्रतिटन ऊस दर जाहीर केला होता. त्यापैकी आतापर्यंत २३०० रुपये अदा करण्यात आले असून दिवाळी सणासाठी १०० रुपये प्रमाणे बिल अदा केले जाईल व उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल, असेही आमदार पाटील म्हणाले. बंद काळातील कर्मचाऱ्यांचा ३१ महिन्याचा थकीत पगार अदा करण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने भंगार विक्रीस मंजुरी दिली आहे, अशी माहिती देण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here