सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात; इच्छुकांची धाकधूक वाढली

पुणे : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर असल्याने इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. आजी-माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक, विविध गावांतील पदाधिकारी, स्थानिक नेते आणि तरुण कार्यकर्त्यांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुमारे २७५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. बारामती येथील राष्ट्रवादी भवनमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि युवा नेते जय पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी विविध गावांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र, अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने इच्छुकांमध्ये उत्सुकतेसोबतच धाकधूक वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह भाजप, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, रासप तसेच काही अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, सत्ताधारी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

दोन्ही राष्ट्रवादी गटांतील संभाव्य युतीची चर्चा

दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये संभाव्य युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे सभासदांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडेही मोठ्या संख्येने इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अंतिम निवडणूक समीकरणात या गटाची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

उमेदवार निवडीकडे लक्ष

सत्ताधारी राष्ट्रवादीच्या उमेदवार निवडीची प्रमुख जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांच्यावर असल्याचे चित्र आहे. कोणत्या गावातून कोणाला संधी मिळणार, विद्यमान संचालकांना पुन्हा संधी दिली जाणार की नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरविले जाणार, याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची धुरा युवा नेते युगेंद्र पवार यांच्याकडे असल्याने या गटाकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे.

युगेंद्र पवारांचा पश्चिम भागात दौरा

युगेंद्र पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून सोमेश्वर कारखान्याच्या पश्चिम भागातील विविध गावांचा दौरा करून सभासदांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही गावोगावी भेटी देत कारखान्याच्या मागील कारभाराबाबत सभासदांशी चर्चा करीत आहेत. त्यामुळे या गटाची आगामी भूमिका काय राहणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार

भाजप, शिवसेना आणि रासप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार की कोणत्या गटाला पाठिंबा देणार, याबाबतचे चित्रही उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ३० सप्टेंबरनंतर प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात कोणते उमेदवार आणि कोणती पॅनेल राहणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या अंतिम राजकीय समीकरणांकडे बारामतीसह पुणे जिल्ह्यातील सभासदांचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here