पुणे : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. २८) अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष नितीन शेंडे यांच्या अधिपत्याखाली पार पडली. वार्षिक सभेत एकरी १०० टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्री सन्मान सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाला. शिवनगर शिक्षण संस्थेचा कारभार सुधारणे, संचालक मंडळाचा वाढलेला भत्ता कमी करणे, कारखान्याचे स्टोअर व स्क्रॅपचे ऑडिट करणे, कामगारांनी शिस्तीचे पालन करावे, बांधकाम विभागातील टेंडर पारदर्शक व्हावीत, वाढलेला प्रक्रिया खर्च कमी करणे, कामगार चाळीतील भाडेकरू काढून टाकावेत, असे महत्त्वाचे निर्णय या सभेत घेण्यात आले. यंदा १३ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. यापुढील काळात माळेगाव कारखाना राज्यात ऊस दराच्या स्पर्धेत पुढे जाईल, अशी ग्वाही अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दुष्काळाचे संकट, उसाची टंचाई आदी समस्यांवर मात करून माळेगावचा विक्रमी ऊस दराचा नावलौकिक टिकविण्यासाठी संचालक मंडळ, कामगार आणि सभासदांनी एकदिलाने यापुढे कार्यरत राहण्याची गरज आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आदींनी काटकसरीने कारभार करण्याची केलेली सूचना मी व संचालक मंडळाने स्वीकारली आहे. साखर, वीज, इथेनॉलसह अधिकचे उत्पन्न देणारा सुमारे ७० कोटी रुपये किमतीचा सीबीजी प्रकल्प वेगाने उभारण्याचे महत्त्वाकांक्षी काम प्रशासनाने हाती घेतले आहेत. ते आता पूर्ण करू.
यावेळी संचालक नितीन सातव यांनी पाच वर्षांत १२६ कोटी भांडवली गुंतवणूक झाल्याचे सांगत कारखान्यावरील कर्जाच्या आकडेवारीची फोड केली. संचालक योगेश जगताप यांनी सीबीजी प्रकल्पाचे फायदे-तोटे मांडले. विश्वास देवकाते, अशोकराव तावरे, मदनराव देवकाते यांनीही क्षारपड जमिनीसह अजितदादांचे स्मारक उभारणे आदी मुद्दे उपस्थित केले. दिग्विजय कोकरे, राजेश देवकाते, दशरथ राऊत, अशोकराव जाधव, अरविंद बनसोडे, विलास सस्ते, प्रकाश सोरटे, विश्वास जगताप आदींनी निर्णायक भूमिका मांडली. ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे प्रश्न सोडविणे, कर्जाचा डोंगर कमी करावा या मुद्यांवरही यावेळी चर्चा झाली.


















