E20 पेट्रोलमुळे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत होऊन कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व होऊ शकते कमी : ONGC संचालक

अहमदाबाद : भारतात E20 पेट्रोलचा वापर वाढल्यास आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करून ऊर्जा क्षेत्रातील स्वावलंबन मजबूत करता येऊ शकते, असे ONGC (ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ)चे संचालक (अन्वेषण) ओम प्रकाश सिन्हा यांनी सांगितले. इंडिया टुडेने PTIच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अहमदाबाद येथील ONGC इन्स्टिट्यूट ऑफ रिझर्व्हॉयर स्टडीज (भूगर्भातील तेल-गॅस साठ्यांचा अभ्यास करणारी संस्था) येथे इंडिया एनर्जी वीक (IEW) २०२७च्या पूर्वतयारी कार्यक्रमात सिन्हा बोलत होते. हा कार्यक्रम कोलकाता येथे आयोजित मुख्य कार्यक्रमाशी ऑनलाइन जोडण्यात आला होता.

सिन्हा यांनी मान्य केले की, E20 पेट्रोलचा वापर वाढवताना काही आव्हाने आहेत. मात्र, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे या इंधनाच्या वापराशी संबंधित अडचणी दूर करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. भारत सध्या आपल्या गरजेच्या सुमारे ९० टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. ग्राहकांना मोठ्या अडचणी न आणता २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य झाल्यास देशाची कच्च्या तेलाच्या आयातीची गरज मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आणि ऊर्जा स्वावलंबनाला चालना मिळू शकते, असे सिन्हा यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel

भारताची वाढीव ऊर्जा गरज जगात सर्वाधिक असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. त्यामुळे इंडिया एनर्जी वीकसारखे व्यासपीठ देशाची वाढती ऊर्जा मागणी, त्यासमोरील आव्हाने आणि संभाव्य उपायांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धामुळे विविध देशांनी परदेशातील ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करून ऊर्जेच्या पुरवठ्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध ठेवण्याची गरज अधोरेखित झाल्याचे सिन्हा म्हणाले.

दरम्यान, देशातील तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढविण्यासाठी ONGCने अन्वेषण (Exploration म्हणजे तेल आणि वायूचे साठे शोधण्याचे काम) वाढविले आहे. कंपनी खोल समुद्रातील क्षेत्रे (Deepwater Blocks म्हणजे समुद्राच्या अधिक खोलीतील तेल-गॅस क्षेत्रे) तसेच सीमावर्ती आणि तुलनेने कमी शोध घेण्यात आलेल्या भागांमध्ये तेल-गॅस साठ्यांचा शोध घेत आहे.भारताचे आयातीत ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून देशांतर्गत ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा भाग आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here