कोल्हापूर : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात झाली. दरवर्षी कारखान्याची सभा नेहमीच वादळी होत आली आहे. मंगळवारच्या सभेला मात्र विरोधकांनी पूर्णपणे पाठ फिरवल्याने सभा शांततेत पार पडली. सभेत मागील वर्षी कारखान्याचा गळीत हंगाम घेता आला नसला तरीही सभासदांना शेअर्सपोटी देण्यात येणारी साखर ५० टक्क्यांप्रमाणे जानेवारीत देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार अमल महाडिक यांनी केली. राज्य सरकारने कारखान्यांच्या को जनरेशन प्रकल्पांतील विजेचा दर सव्वा रुपया प्रति युनिटने वाढवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
अध्यक्ष महाडिक म्हणाले की, शासनाने कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पातून तयार होणारी वीज प्रतियुनिट ४ रुपये ७५ पैसेऐवजी ६ रुपये दराने खरेदी करावी, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २० ऐवजी २५ टक्के करावे, घरगुती आणि कमर्शिअल वापराच्या साखरेचा दर वेगवेगळा ठेवावा. कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी अहवाल वाचन केले. सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली. संचालक तानाजी पाटील यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, उपाध्यक्ष गोविंदा चौगले यांच्यासह संचालक उपस्थित होते. दरम्यान, विरोधकांनी सभेकडे पाठ फिरवल्याने सभा अर्ध्या तासात शांततेत आटोपली. पूर्वी विरोधकांकडून सभेसाठी जाणाऱ्या रोडवर आरोप-प्रत्यारोपांचे दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात फलक लावले जात असत. यंदाच्या सभेला मात्र असा एकही फलक कुठेही दिसला नाही. त्यामुळे वातावरण एकदम शांत होते.


















