नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 2027 च्या पहिल्या सहामाहीपर्यंत रेपो दरात एकूण 100 बेसिस पॉइंट्सची (1 टक्का) वाढ करू शकते, असा अंदाज बँक ऑफ अमेरिका (BofA) सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे. यापूर्वी पहिली व्याजदरवाढ डिसेंबरमध्ये होईल, असा अंदाज होता; मात्र आता ती ऑक्टोबरमध्येच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
BofA Securities च्या ताज्या ‘इंडिया व्ह्यू पॉइंट’ अहवालानुसार, 7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरबीआयच्या पतधोरण बैठकीत रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ होऊ शकते. त्यानंतर आणखी 75 बेसिस पॉइंट्सची वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे रेपो दर 6.25 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.यापूर्वी BofA Securities ने एकूण 50 बेसिस पॉइंट्सच्या दरवाढीचा अंदाज व्यक्त केला होता. आता हा अंदाज दुप्पट करून 100 बेसिस पॉइंट्स करण्यात आला आहे.
BofAच्या मते, देशांतर्गत आर्थिक वाढीचा वेग तुलनेने मजबूत असल्याने आरबीआयला दरवाढीसाठी आणखी प्रतीक्षा करण्याची गरज कमी झाली आहे. त्याचवेळी महागाईचे धोकेही वाढत आहेत. सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती बहुतांश काळ 100 ते 110 डॉलर प्रति बॅरल या पातळीवर राहिल्या. इंधनाच्या किमती वाढण्याबरोबरच अन्नधान्याच्या पुरवठ्यावर दबाव येण्याची शक्यताही वाढली आहे.ब्रोकरेजच्या अंदाजानुसार, आरबीआय 2026 च्या चौथ्या तिमाहीत 50 बेसिस पॉइंट्स आणि 2027च्या पहिल्या सहामाहीत आणखी 50 बेसिस पॉइंट्सची दरवाढ करू शकते.
डिसेंबरमध्ये धोरणात्मक भूमिकेत बदलाची शक्यता
आरबीआय डिसेंबरमध्ये आपल्या मौद्रिक धोरणाच्या भूमिकेत बदल करून टप्प्याटप्प्याने कडक धोरण स्वीकारू शकते, असेही BofAने म्हटले आहे.मजबूत आर्थिक वाढीमुळे आरबीआयला सध्या असलेली उदार मौद्रिक भूमिका कायम ठेवण्याची गरज कमी होत असल्याचे BofAचे म्हणणे आहे. सप्टेंबरमध्ये अन्नेतर कर्जवाढ 17.8 टक्के राहिली. तसेच, आर्थिक वर्ष 2026-27च्या दुसऱ्या तिमाहीत गुंतवणुकीची मागणीही मजबूत राहण्याची अपेक्षा आहे.
महागाईचा वाढता दबाव
अहवालात वाढत्या महागाईच्या जोखमीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. अन्नमहागाईचा दबाव आता अधिक व्यापक होत असून, घाऊक महागाईचा परिणाम इतर क्षेत्रांपर्यंतही पोहोचत आहे. ऑगस्ट 2026मध्ये ट्रेडेबल्स महागाई 5.9 टक्क्यांवर पोहोचल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.जर वास्तविक GDP वाढ सुमारे 7 टक्के राहिली आणि एकूण महागाई 5.5 टक्क्यांच्या आसपास टिकून राहिली, तर RBIकडून 100 बेसिस पॉइंट्सपेक्षाही अधिक दरवाढ होऊ शकते, असा BofAचा अंदाज आहे.
अशा परिस्थितीत अल्प मुदतीचे व्याजदर 6.5 टक्क्यांपेक्षा अधिक होऊ शकतात.मात्र, आर्थिक वाढीत मोठी घसरण झाल्यास दरवाढीचे प्रमाण कमी होऊ शकते किंवा आरबीआय दरवाढ टाळू शकते. आर्थिक वाढ 7 टक्क्यांच्या खाली घसरून पुढील काळात 6 टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता निर्माण झाल्यास अशी परिस्थिती उद्भवू शकते, असे अहवालात म्हटले आहे.


















