पुणे : सोमेश्वर कारखान्याची होणार तिरंगी निवडणूक, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची स्वतंत्र पॅनेलची घोषणा

पुणे : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत बुधवारी, माघारीच्या दिवशी नवे राजकीय वळण मिळाले. अजित पवार गट, शरदचंद्र पवार गट आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र पॅनेल अशी तीन गटांची निवडणूक लढत होण्याचे चित्र आहे. कारखाना निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटानेही स्वतंत्र पॅनेलची तयारी सुरू ठेवली. अशात कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी समर्थकांचा मेळावा घेत स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली. त्यामुळे तिरंगी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माघारीच्या अंतिम दिवशी वाणेवाडी येथे जगताप समर्थकांचा मेळावा झाला. त्यानंतर पुरुषोत्तम जगताप आणि संजय जगताप यांनी पत्रकार परिषद घेत २१ उमेदवारांच्या स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली. छाननीनंतर २१ संचालकपदांसाठी ५१४ उमेदवार रिंगणात होते. १ ऑक्टोबरला अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. ११ ऑक्टोबरला मतदान, तर १२ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

पुरुषोत्तम जगताप आणि अभिजित काकडे यांच्या गटातील मतभेदांमुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार यादी उशीरा जाहीर झाली. त्यामध्ये राजवर्धन शिंदे, अभिजित काकडे, शैलेश रासकर, ऋषिकेश गायकवाड, संग्राम सोरटे, प्रणिता खोमणे आणि सुनील भगत या सात विद्यमान संचालकांसह प्रमोद काकडे, डॉ. वसंत दगडे, उत्तम धुमाळ आणि सुधाकर टेकवडे या चार माजी संचालकांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडूनही २१ उमेदवारांची जुळवाजुळव झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. मात्र अंतिम तोडगा निघाला नाही. जगताप हे ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’चे नेतृत्व करणार आहेत. ते ३५ वर्षे संचालक आणि सलग १३ वर्षे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पॅनेलमध्ये विद्यमान संचालक विश्वास जगताप, मिलिंद कांबळे, माजी पं. स. सदस्य राहूल भापकर, कारखान्याचे माजी संचालक महेश काकडे, सचिन खलाटे, महेश राणे यांचा समावेश आहे. तसेच माजी सरपंच सतीश सकुंडे, वैभव गायकवाड, गोरख खोमणे, निलेश केदारी आणि धनंजय गडदरे यांच्यासह विविध भागांतील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here