सांगली : शासनाने साखर उद्योगाच्या आर्थिक व्यवहार्यतेसाठी बाजारातील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक धोरणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. साखरेचे उत्पादन, उपलब्ध साठा, देशांतर्गत मागणी, निर्यात, इथेनॉल उत्पादन, साखरेचा किमान विक्री दर यांचा समन्वित विचार करून धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत साखरेच्या किरकोळ दरात १५ टक्के, तर दरात २८ कारखान्यातील विक्री सुमारे टक्के घट झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली असून ऊस बिलांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मत विश्वासराव नाईक कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळे शासनाकडून धोरणात्मक निर्णयाची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्यकारी संचालक पाटील म्हणाले की, कारखान्यांच्या उत्पादन खर्चामधील ऊस खरेदी किंमत हा सर्वात मोठा खर्चाचा घटक आहे. तोडणी व वाहतूक, मजुरी, वीज, इंधन, देखभाल-दुरुस्ती, रसायने, व्याज, पॅकिंग तसेच प्रशासनिक खर्चातही वाढ झाली आहे. गेल्या काही काळात बाजारपेठेत साखरेच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्याचा कारखान्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होत आहे. नवीन साखर हंगामाच्या पार्श्वभूमीवर, सणासुदीच्या काळात ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने उपाययोजना कडक केल्या आहेत. सरकारने साखर व्यापाऱ्यांसाठी साठा बाळगण्याचा कालावधी १५ दिवसांपर्यंत कमी केला आहे. साठ्याची मर्यादा एक हजार क्विंटल केली आहे. त्याचाही फटका कारखान्यांना बसत आहे.


















