धाराशिवमध्ये ऊस दरप्रश्नी डीडीएन शुगरची ऊसतोड यंत्रणा बंद पाडली

धाराशिव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ५ हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी संघटनेने जिल्हाभर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून रविवारी (ता. ४) कळंब तालुक्यातील वाठवडा येथे डीडीएन शुगरची ऊसतोड यंत्रणा बंद पाडण्यात आली. दुष्काळी परिस्थिती, खरीप पिकांचे नुकसान, घटलेले उत्पादन आणि वाढता शेती खर्च यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच ऊस उत्पादकांना समाधानकारक पहिली उचल मिळणे आवश्यक असल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.

पाच हजारांची पहिली उचल देण्याची मागणी

ChiniMandi WhatsApp Channel

शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ५ हजार रुपये पहिली उचल द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत ऊसतोड यंत्रणा सुरू करू दिली जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णुदास काळे यांनी दिला.शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे. मागणी मान्य न झाल्यास धाराशिव जिल्ह्यातील ऊसतोड यंत्रणा सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच ऊसदराचा प्रश्न पेटण्याची शक्यता

दरम्यान, ऊसदराच्या मागणीसाठी संघटनेने आंदोलनाची धार वाढवल्याने गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच ऊसदराचा प्रश्न चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील दराचा प्रश्न आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here