नवी दिल्ली : जागतिक व्यापारातील मंदी आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही भारताने चालू आर्थिक वर्षात 1 ट्रिलियन डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशाची एकूण निर्यात 863 अब्ज डॉलर होती, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी दिली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत आयोजित CII पार्टनरशिप समिटमध्ये बोलताना गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, आंतरराष्ट्रीय व्यापाराची वाढ केवळ 2.5 ते 3 टक्के राहण्याची शक्यता असतानाही भारत सुमारे 16 टक्के निर्यातवाढ साध्य करू शकतो. गोयल म्हणाले, निर्यातीमध्ये मोठी वाढ करण्याचे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले असून, चालू वर्षात 1 ट्रिलियन डॉलरची निर्यात साध्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते म्हणाले की, आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील आकडेवारी पाहता भारत हे लक्ष्य साध्य करेल, असा त्यांना विश्वास आहे.
जागतिक आर्थिक अनिश्चिततेत मोठे लक्ष्य
जागतिक आर्थिक विकासदर 3 टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता असताना भारताने हे महत्त्वाकांक्षी निर्यात लक्ष्य निश्चित केले आहे. भू-राजकीय आणि आर्थिक घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासमोरही विविध आव्हाने निर्माण झाली आहेत. भारतीय उद्योगांना परदेशी बाजारपेठांमधील संधींचा लाभ घेता यावा यासाठी गोयल यांनी भारतीय उद्योग महासंघाला (CII) प्रत्येक राज्य परिषदेमध्ये मुक्त व्यापार करार (FTA) वापर कक्ष सुरू करण्याचे आवाहन केले. या कक्षांमार्फत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) बाजारपेठेतील प्रवेशाच्या संधी, मालाच्या उत्पत्तीचे नियम (Rules of Origin) तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन मिळावे, असे त्यांनी सांगितले.
38 विकसित देशांसोबत व्यापार करार
भारताच्या वाढत्या व्यापार भागीदारीचा उल्लेख करताना गोयल म्हणाले की, गेल्या सुमारे साडेचार ते पाच वर्षांत भारताने 38 विकसित देशांना व्यापणारे 9 मुक्त व्यापार किंवा प्राधान्य व्यापार करार पूर्ण केले आहेत. या देशांच्या एकत्रित जागतिक GDPचे मूल्य सुमारे 60 ट्रिलियन डॉलर आहे. भारताने केलेल्या व्यापार करारांमध्ये कृषी, मत्स्यव्यवसाय आणि MSME यांसारख्या संवेदनशील देशांतर्गत क्षेत्रांच्या हितांचे संरक्षण करण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय निर्यातदारांसाठी नवीन बाजारपेठांच्या संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे गोयल यांनी सांगितले.
आर्थिक विकासदर 7 टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा विश्वास
देशांतर्गत अर्थव्यवस्थेबाबत गोयल यांनी चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासदर 7 टक्क्यांपेक्षा अधिक राहील, असा विश्वास व्यक्त केला. भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी आर्थिक विकासाच्या अंदाजात केलेल्या वाढीचाही त्यांनी उल्लेख केला. “चालू वर्षातही भारताचा आर्थिक विकासदर 7 टक्क्यांपेक्षा अधिक राहील, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे,” असे गोयल म्हणाले.
आंध्र प्रदेशात उदयोन्मुख तंत्रज्ञानाला चालना
उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आंध्र प्रदेशाची वाढती भूमिका याकडेही गोयल यांनी लक्ष वेधले. विशाखापट्टणम येथे Googleकडून प्रस्तावित AI हब तसेच अमरावतीचा क्वांटम तंत्रज्ञान केंद्र म्हणून होणारा विकास यांचा त्यांनी उल्लेख केला.केंद्र आणि राज्य सरकारांमधील सहकार्यामुळे जागतिक व्यापारातील संधींचे रूपांतर कारखाने, डेटा सेंटर आणि रोजगारनिर्मितीमध्ये करण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गोयल यांनी 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या CII पार्टनरशिप समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना आमंत्रित केले.


















