पुणे : ‘श्री सोमेश्वर’ कारखान्याच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान; शांततेत प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

पुणे : बारामती येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ ते २०३१-३२ या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे मतदान रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ९३ मतदान केंद्रांवर होणार आहे. या निवडणुकीत २१ संचालक निवडून दिले जाणार असून, मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सभासदांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे विभागीय सहनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी केले आहे.

२७ हजार ७६७ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

ChiniMandi WhatsApp Channel

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर, तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व खंडाळा या चार तालुक्यांत विस्तारलेले आहे. या निवडणुकीसाठी उत्पादक सभासद प्रतिनिधी गटातील २७ हजार ६२६ आणि ‘ब’ वर्गातील सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थांचे १४१ मतदार असे एकूण २७ हजार ७६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

८३ उमेदवार निवडणूक रिंगणात

या निवडणुकीसाठी सुरुवातीला ५५६ उमेदवारांचे एकूण ६०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर ५१४ अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत ४३१ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये तीन पॅनेलचे ६२ उमेदवार आणि २१ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

२१ संचालकांची होणार निवड

कारखान्याच्या संचालक मंडळातील २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये उत्पादक सभासद प्रतिनिधी गट क्रमांक १ ते ५ मधून प्रत्येकी तीन याप्रमाणे १५ संचालक निवडले जाणार आहेत. याशिवाय ‘ब’ वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था मतदारसंघातून एक, महिला राखीव मतदारसंघातून दोन, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून एक, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून एक आणि भटक्या जाती-विमुक्त जमाती-विशेष मागास प्रवर्गातून एक संचालक निवडला जाणार आहे.

मतदानासाठी ७०० कर्मचारी तैनात

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ९३ मतदान केंद्रांवर एकूण ७०० मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

सोमवारी मतमोजणी

मतदानानंतर सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजल्यापासून माळेगाव बुद्रुक येथील नीरा-बारामती रस्त्यावरील अजंता मॅजेस्टिक बँक्वेट हॉलमध्ये एका फेरीत मतमोजणी होणार आहे. यासाठी ४५० मतमोजणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, मतमोजणी केंद्रावरही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here