पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचावार्षिक निवडणुकीच्या जाहीर प्रचााराची सांगता झाली. कारखाना निवडणूक तिरंगी होत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल आणि कारखान्याचे अध्यक्ष पुुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे चित्र सुरुवातीपासूनच कायम राहिले. आता मतदानापूर्वीच्या डावपेचांना जोर आला आहे. निवडणुकीच्या रिंगणातील सर्वच पॅनलकडून मतदारांच्या गुप्त गाठीभेटी- मतदारांना आणण्याचे प्लॅनिंग यावर भर देण्यात आला आहे. जाहीर प्रचार सांगताप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जर कोणी कारखान्याच्या हिताला बाधा आणत असेल तर आपण मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा विरोधकांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, कारखाना हा दिवंगत अजितदादांच्या जिव्हाळ्याचा आणि प्रतिष्ठेचा विषय होता. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा संस्थेचे हित महत्त्वाचे आहे. सभासद आणि शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणण्याचा कोणी प्रयत्न केला, तर आपणही मागे-पुढे पाहणार नाही, असे म्हणत पवार यांनी विरोधकांचे नाव न घेता त्यांच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी मंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री विजय शिवतारे, जय पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पृथ्वीराज जाचक, नितीन शेंडे, करण खलाटे, किरण तावरे आदी उपस्थित होते. संभाजी होळकर यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष व लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलचे प्रमुख पुरुषोत्तम जगताप यांनी केले. प्रचाराच्या सांगता सभेत आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत असे सुनावले. ते म्हणाले की, कारखान्याला राज्यात सर्वाधिक ऊसदर देणारा कारखाना म्हणून मिळालेली ओळख कायम ठेवून देशातही अव्वल स्थानावर नेण्याचे उद्दिष्ट आहे. दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि सभासदांच्या हितासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.


















