कोल्हापूर : साखरेचा किमान हमीभाव प्रतिकिलो ५० रुपये करावा, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सोमवारी केंद्रीय मंत्र्यांसोबत घेतलेली बैठक निष्फळ ठरली. मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली; मात्र यावर शेतकरी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आज, मंगळवारी कोगनोळी टोलनाक्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्धार संघटनांनी कायम ठेवला आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र, पुसा येथे ही बैठक झाली. यावेळी कृषिमंत्री चौहान यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दरवर्षी रास्त व किफायतशीर दरात (एफआरपी) वाढ करण्यात आल्याचे सांगितले.
यावर आक्षेप घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी खतांचे, कीटकनाशकांचे, औषधांचे, मजुरीचे तसेच ऊसतोडणी आणि वाहतुकीचे वाढलेले दर विचारात घेण्याची मागणी केली. साखर कारखान्यांच्या प्रक्रिया खर्चात किती वाढ झाली, याचाही अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून या प्रश्नांवर चर्चेसाठी वेळ मागत असूनही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले जात नसल्याची टीका त्यांनी केली.
यावर पुढील महिनाभरात मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करून मार्ग काढण्याचे आश्वासन कृषिमंत्री चौहान यांनी दिले. मात्र, निर्णय घेण्याचे अधिकार नसतील, तर बैठकीचे आश्वासन कशासाठी दिले, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
या बैठकीला कर्नाटकचे सहकार मंत्री लक्ष्मण सवदी, कृषिमंत्री चलोराय स्वामी, साखर मंत्री रुद्राप्पा लमानी, स्वाभिमानीचे राजेंद्र गड्यान्नावर, योगेश पांडे तसेच केंद्र सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘एफआरपीचा बेस वाढला; शेतकऱ्यांच्या पदरात मातीच’
गेल्या आठ वर्षांपासून साखरेच्या हमीभावात वाढ झालेली नाही. त्यामुळे साखरेच्या आधारे कारखान्यांना मिळणाऱ्या कर्जावर मर्यादा येत असून साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. केंद्र सरकारने एफआरपीमध्ये वाढ केली असली, तरी एफआरपीचा आधारभूत दर वाढविण्याच्या पद्धतीमुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नसल्याची टीका त्यांनी केली.
शेतकरी संघटनांच्या प्रमुख मागण्या
साखरेचा किमान हमीभाव प्रतिकिलो ५० रुपये करावा.
इथेनॉलची खरेदी प्रतिलिटर ७० रुपये दराने करावी.
उसाच्या वजनातील काटामारी रोखण्यासाठी कठोर कायदा करावा.
साखर कारखान्यांकडून होणारी रिकव्हरी चोरी रोखण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात येथे महामार्ग रोखणार
कोगनोळी टोलनाका : कोल्हापूर-बेळगाव सीमेवर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग : कराड, सातारा आणि इंदापूर येथे शेतकरी महामार्ग रोखणार.
मराठवाडा : परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतही राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचे नियोजन.
कर्नाटक : कर्नाटक रयत संघ आणि ग्रीन ब्रिगेडच्या वतीने हुबळी, गदग आणि हत्तरकी येथे महामार्ग रोखण्यात येणार.
बैठकीतून ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी संघटनांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवली असून, साखर उद्योगाच्या प्रश्नांवर केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















