छत्रपती संभाजीनगर : धामोरी बुद्रुक येथील मुक्तेश्वर साखर कारखान्याचा १७ वा गळीत हंगाम सोमवारी बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाणीत मोळी टाकून सुरू करण्यात आला. गिरी आश्रमाचे कैलासगिरी महाराज आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रामचंद्र निरपळ व निर्मलाताई निरपळ या दांपत्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जंगम यांनी गळीत हंगामाच्या सूक्ष्म नियोजनाची माहिती दिली. कार्यक्रमात विविध कामगारांचा सत्कारही करण्यात आला.
कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रामचंद्र निरपळ म्हणाले की, कारखान्याने नेहमीच शेतकरी व कामगारांचे हित जोपासले आहे. चेअरमन सचिन निकम व संचालक प्रशांत शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा हंगाम सुरू होत असून, यावर्षीच्या ऊस टंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नंदकुमार कुंजर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र जंगम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मुख्य अभियंता दिगंबर अडकीने, शेतकी अधिकारी नंदकुमार कुंजर, मुख्य रसायनतज्ज्ञ पंडित गोर्डे, अभियंता प्रमोद काळे, रामेश्वर म्हस्के, श्रीकांत गोरे, सखाराम मोरे, किरण सरोदे, बाबूलाल गंगवाल, विनोद मोरे, विठ्ठल काळे यांच्यासह परिसरातील शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















