पुणे : नुकत्याच झालेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व जागांवर प्रचंड मताधिक्याने विजय प्राप्त केला. आता कारखान्याचे नेतृत्व करण्यासाठी अनुभवी व्यक्तींना संधी दिली जाते की नव्या चेहऱ्याला याबाबत विविध तर्कवितर्क केले जात आहेत. राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे यांच्या नावाची प्राधान्याने चर्चा सुरू आहे. उपाध्यक्षपदी पाच वर्षात पाच गटातील संचालकाला संधी दिली जाते, ही कारखान्याची परंपरा आहे. त्यात बदल होणार नाही, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पाच संचालकांना पाच वर्षे उपाध्यक्षपदाची संधी मिळणार, हे निश्चित आहे. येत्या पंधरवड्यात ही प्रक्रीया पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे याबाबत आता विचारविनिमय सुरू झाला आहे.
आगामी काळ सहकारी साखर कारखानदारीसाठी कसोटीचा ठरणार आहे. तसेच, टंचाईचे सावट समोर उभे ठाकल्याने कारखान्याचे नेतृत्व करणाऱ्यांची कसोटी लागणार आहे. राजवर्धन शिंदे यांनी यापूर्वी कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे. दरम्यान, कारखान्यात स्वीकृत संचालकांच्या दोन जागा आहेत. निवडणुकीदरम्यान ज्यांना संधी देता आली नाही व ज्यांनी निवडणुकीत चांगले काम केले, अशा सभासदांची वर्णी या जागांवर लागू शकते. पाच वर्षे दोनच संचालकांना संधी द्यायची की दरवर्षी दोन नवीन सभासदांना स्वीकृतपदी नियुक्त करायचे, याबाबतही काय निर्णय घेतला जातो, याबाबतही सभासदांत उत्सुकता आहे.


















