छत्रपती संभाजीनगर : येथील बारामती ॲग्रो लिमिटेड शुगर युनिट-२ च्या यंदाच्या गाळप हंगामाचा प्रारंभ गुरुवारी (ता. १५) कारखान्याचे व्हाइस चेअरमन सुभाष गुळवे यांच्या उपस्थितीत मोळीपूजनाने झाला. यंदा कारखान्याने ८ ते ८.५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याने ऊस वाहतुकीसाठी २३० बैलगाड्या, ३६९ ट्रॅक्टर, २८१ जुगाड आणि १२० ट्रक अशी यंत्रणा सज्ज असून, याद्वारे दररोज ८,००० टन वाहतूक शक्य होणार आहे. तालुक्यासह परिसरातील गेटकेन क्षेत्रातून एकूण ६२,९३८ एकर उसाची नोंद झाली असल्याची माहिती चेअरमन गुळवे यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमात कारखान्याचे कर्मचारी धनराज पाटील व त्यांच्या पत्नीच्या हस्ते सत्यनारायण पूजन झाले. चेअरमन गुळवे यांनी केंद्र सरकारने ऊस उत्पादकांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणीही केली. ऊस वाहतूकदार व मुकादमांची देणी वेळेवर देण्याची परंपरा कारखान्याकडून कायम राखली जाईल अशी ग्वाही दिली. या वेळी व्हाइस प्रेसिडेंट मिलिंद देशमुख, मुख्य शेतकी अधिकारी असिफ खान पठाण, मुख्य अभियंता सुनील चौळके, सतीश तेलांडे, सखाहरी जाधव, सतीश कुलकर्णी, मिलिंद बोचरे, तुकाराम जोशी यांच्यासह शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.

















