सोलापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे. कारखानदारांनी ऊसदर जाहीर केल्याशिवाय शेतकरी ऊसतोड सुरू करणार नाहीत. शेतकऱ्यांची एकजूट हीच आमची ताकद असून, उसाला योग्य दर मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. ऊस दराचा प्रश्न मार्गी न लागल्यास माचणूर चौकात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ,” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी दिला. ऊस दराच्या प्रश्नावर ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. ऊस दराचा तोडगा न निघाल्यास राष्ट्रीय महामार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार केला. साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड घेणार नाही, असा एकमुखी ठराव करण्यात आला. यावेळी अॅड. राहुल घुले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ऊसदरासाठी शेतकऱ्यांनी एकजूट कायम ठेवून संघटितपणे लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीस सज्जनराव पाटील, प्रतापभाऊ पाटील, संजय चरणूकाका पाटील, बाळकृष्ण मोरे, रवींद्र पुजारी, विजयकुमार पाटील, बी. एस. मोरे, राजेंद्र रणे, अशोक मोरे, अण्णासाहेब शिस्सट, सिद्धेश्वर डोके, समाधान पाटील, दिलीपदादा पुजारी, अण्णासो चौगुले, रणजीत पाटील, बापू कोकरे, मधुकर कोकरे, सुरेश भोसले, बाबासो चव्हाण, चंद्रकांत मडवळे, महादेव सोलनकर, महादेव रणे, पांडुरंग पुजारी, अकिल पटेल यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

















