सांगली : राज्य सरकारचा राज्यातील साखर कामगार आणि सहकारी साखर कारखानदारी उद्धवस्त करण्याचा डाव आहे. येत्या २२ तारखेपासूनचा बेमुदत संप यशस्वी करून शासनाला तुमची ताकद दाखवून द्या, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केले. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर साखर कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्य सरचिटणीस राऊ पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष प्रदीप पाटील, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, कोल्हापूर जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, सचिव संजय मोरबाळे, सयाजी कदम, संजय पाटील, तानाजी खराडे उपस्थित होते.
तात्यासाहेब काळे म्हणाले, राज्य सरकारने २२ जुलैला कामगार कायदा रद्द करून साखर कामगारांचे कवच काढून घेतले आहे. आम्ही हा कायदा पूर्ववत करावा. तसेच साखर कामगारांच्या विविध मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री, कामगारमंत्री, सहकारमंत्री, कामगार आयुक्त, साखर आयुक्तांकडे केली होती. मात्र, शासनाने फारसे गांभीर्य दाखविले नाही. त्यामुळे कोल्हापूर येथे मोर्चा काढून दि. २२ पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप शिंदे, अविनाश पाटील, तानाजी खराडे यांची भाषणे झाली. शशिकांत सांडगे, चंद्रकांत पवार, तानाजी साळुंखे, विजय देशमुख, कामगान प्रतिनिधी विकास पवार, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, योगेश जाधव, विकास पाटील, सचिन कोकाटे उपस्थित होते.


















