अहिल्यानगर : राहुरीत ऊस उत्पादकांचा रास्ता रोको, पहिली उचल प्रतिटन पाच हजार देण्याची मागणी

अहिल्यानगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रुपये पहिली उचल मिळावी, साखरेची किमान विक्री किंमत वाढवावी आणि ऊस वजनातील काटामारी थांबवावी, यासह विविध मागण्यांसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रलंबित प्रश्नांकडे सरकार आणि साखर कारखानदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी तहसीलदार डॉ. अमित पवार व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले.

ऊस उत्पादनासाठी वाढलेला खर्च, शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांच्या वाढलेल्या किमती आणि शेतीतील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर उसाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळावा, या मागणीसाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मागण्या मान्य झाल्याशिवाय महामार्गावरुन आम्ही हटणार नाही असा इशारा नेते रवींद्र मोरे यांनी दिला. एका तासानंतर तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी महामार्ग वाहतूकीसाठी खुला केला.

ChiniMandi WhatsApp Channel

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रुपये पहिली उचल देण्यात यावी, ही आंदोलनातील प्रमुख मागणी होती. त्याचबरोबर साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये करण्यात यावी, दहा वर्षात ऊसाचा उत्पादन खर्च अनेक पटींनी वाढला. इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करण्यात यावा आणि कारखाने लवकर सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान देण्यात यावे, अशा मागण्या आंदोलकांनी मांडल्या.

ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली गेली. केवळ आश्वासने न देता ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर शासनाने आणि साखर कारखानदारांनी ठोस निर्णय घ्यावेत, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते रवींद्र मोरे, राजेंद्र लोंढे, दिलीप इंगळे, संजय पोटे यांनी केले. त्यांच्यासह प्रकाश देठे, अॅड. पंढरीनाथ पवार, संजय काले, विठ्ठल शेळके यांची भाषणे झाली. जालिंदर गाडे, अनिल इंगळे, नारायण टेकाळे, रामभाऊ जगताप, विशाल जाधव, राजेंद्र वराळे, साहेबराव जगताप, सतीश पवार, संदीप खरुद, आप्पासाहेब पवार, दीपक तनपुरे, कैलास पवार, आनंद वने, सुभाष आढाव यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here