सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्षेत्रातील सभासदांना मोफत घरपोच साखर वाटप करण्याचा उपक्रम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ५९ गावांमध्ये साखर वाटप पूर्ण झाले असून, दिवाळीपूर्वी उर्वरित सर्व गावांतील सभासदांपर्यंत साखर पोहोचविण्याचे नियोजन कारखाना प्रशासनाने केले आहे.
जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या वतीने डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांनी प्रत्येक सभासदाला प्रतिशेअर्स ६० किलो मोफत साखर थेट घरपोच देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, सभासदांना घरपोच साखर वितरित केली जात आहे. बोरगाव येथे सभासदांना मोफत घरपोच साखरेचे वाटप करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक सत्यजित पाटील, संजय पाटील, प्रमोद शिंदे, सूर्यकांत पाटील यांच्यासह कारखान्याचे सभासद उपस्थित होते.घरपोच साखर वाटपाच्या या उपक्रमामुळे बोरगाव परिसरातील सभासदांनी समाधान व्यक्त केले. तसेच या उपक्रमाबद्दल कारखाना प्रशासन आणि अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचे आभार मानले.


















