नवी दिल्ली : बिहारमधील भौगोलिक मानांकन (GI Tag) प्राप्त मिथिला मखाना आपल्या उत्कृष्ट पौष्टिक गुणधर्मांमुळे, चविष्ट कुरकुरीतपणामुळे आणि विविध प्रकारे वापरता येण्याच्या वैशिष्ट्यामुळे जगभरातील लोकांची मने जिंकत असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. या उत्पादनाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील लोकप्रियता सातत्याने वाढत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये गोयल यांनी मिथिला मखानाचा उल्लेख ‘सुपरफूड’ असा केला. तसेच, त्याची लोकप्रियता वाढवण्यात शेतकऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले.
बिहारमधील स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. गोयल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “बिहारच्या जीआय-टॅग प्राप्त मिथिला मखानाने आपल्या उत्कृष्ट पौष्टिक गुणधर्मांमुळे, अप्रतिम कुरकुरीतपणामुळे आणि बहुपयोगी स्वरूपामुळे जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत. या जागतिक यशामागे मेहनती शेतकऱ्यांचे अथक परिश्रम आहेत. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या प्रयत्नांसोबतच बिहारमधील स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
मखाना म्हणजे काय?
मखाना या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Euryale ferox असे आहे. ही प्रामुख्याने उथळ तलाव, सरोवरे आणि पाणथळ प्रदेशांमध्ये वाढणारी जलवनस्पती आहे. तिच्या बियांवर प्रक्रिया करून किंवा त्या भाजून फुलवल्या जातात. त्यातून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थाला मखाना किंवा फॉक्स नट्स असे म्हटले जाते. पौष्टिक गुणधर्मांमुळे मखानाचा वापर प्रामुख्याने हलका आणि आरोग्यदायी खाऊ म्हणून केला जातो.
भारतातून २० हून अधिक देशांमध्ये निर्यात
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतातून ७,००० मेट्रिक टनांहून अधिक मखाना आणि मूल्यवर्धित मखाना उत्पादनांची २० हून अधिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यात आली. यामध्ये अमेरिका, मध्यपूर्वेतील देश आणि आफ्रिकेतील बाजारपेठांचा समावेश आहे. भारतातील एकूण मखाना उत्पादनापैकी जवळपास ८५ टक्के उत्पादन बिहारमध्ये होते. त्यामुळे बिहार हे देशातील मखाना उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा मखाना उत्पादक देश आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये मखानाची लागवड प्रामुख्याने केली जाते. पूर्वी बिहारपुरता मर्यादित असलेला मखानाचा वापर आता देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत आहे. आरोग्याविषयी वाढती जागरूकता, मखानापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करणाऱ्या स्टार्टअप्सचा विस्तार आणि शेतकरी उत्पादक संघटनांचा (FPOs) वाढता सहभाग यामुळे या क्षेत्राला चालना मिळत आहे.
मखाना क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न
मखानाच्या व्यापाराला अधिक चालना देण्यासाठी केंद्र सरकारने जुलै २०२५ पासून मखानासाठी स्वतंत्र हार्मोनाइज्ड सिस्टीम (HS) कोड लागू केला. केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ अंतर्गत करण्यात आलेल्या या वर्गीकरणामुळे मखाना उत्पादनांसाठी स्वतंत्र व्यापार संकेतांक उपलब्ध झाला आहे.मखाना क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये राष्ट्रीय मखाना मंडळाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर १५ सप्टेंबर २०२५ रोजी बिहारमध्ये या मंडळाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
याशिवाय, केंद्र सरकारने २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठी मखाना विकासाच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी एकूण ४७६.०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.या योजनेचा उद्देश संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, दर्जेदार बियांची उपलब्धता वाढवणे, शेतकऱ्यांचे कौशल्य विकसित करणे, काढणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियांमध्ये सुधारणा करणे, मूल्यवर्धन व ब्रँडिंगला चालना देणे, विपणन आणि निर्यातीचा विस्तार करणे तसेच उत्पादनाच्या गुणवत्ता नियंत्रणात सुधारणा करणे हा आहे.या योजनेंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ३० कोटी रुपये, तर २०२६-२७ साठी ९० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.मखाना क्षेत्रातील या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना अधिक संधी उपलब्ध होण्यासोबतच भारतीय मखानाची जागतिक बाजारपेठेतील ओळख आणि मागणी वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.


















