सांगली : साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारच्या पातळीवर शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे साखर आणि इथेनॉलच्या दरवाढीच्या मागण्यांवर केंद्रात चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सांगली दौऱ्यादरम्यान भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश खराडे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आणि जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांच्यासह विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले.
साखर आणि इथेनॉलच्या दरवाढीची मागणी
साखरेची सध्याची किमान विक्री किंमत उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपुरी असल्याचे सांगत ती प्रतिकिलो ५० रुपये करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली. तसेच साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळावे आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली.साखर एमएसपी आणि इथेनॉलचे दर निश्चित करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असल्याने राज्य सरकारने या प्रश्नांवर केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
उसाला पाच हजार रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी
दरम्यान, उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा, शेतकऱ्याच्या बांधावरच उसाची रिकव्हरी मोजण्याची व्यवस्था करावी आणि ऊसतोडणीसाठी अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्यांविरोधात खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर केंद्र सरकारच्या पातळीवर होणाऱ्या संयुक्त बैठकीच्या तारखेकडे शेतकरी संघटनांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत साखरेची एमएसपी आणि इथेनॉलच्या दरवाढीबाबत कोणता निर्णय होतो, याकडे शेतकरी तसेच साखर उद्योगाचे लक्ष राहणार आहे.


















