कोल्हापूर : राज्यात नव्या ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असली तरी 2025-26 गाळप हंगामातील 119 कोटी रुपयांची एफआरपी 21 साखर कारखान्यांकडे अद्याप थकीत आहे. 16 ऑक्टोबर 2026 रोजी साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, गाळप हंगामात सहभागी झालेल्या राज्यातील एकूण 210 साखर कारखान्यांपैकी 189 कारखान्यांनी शेतकऱ्यांना 100 टक्के एफआरपी अदा केली आहे.
राज्यातील 210 साखर कारखान्यांनी संबंधित हंगामात एकूण 1,045.63 लाख टन उसाचे गाळप केले होते. तोडणी व वाहतूक (H&T) खर्चासह एकूण सकल एफआरपी देयता 40,446 कोटी रुपये होती. कारखान्यांनी एकूण 41,854 कोटी रुपये एफआरपीपोटी शेतकऱ्यांना दिले. मात्र, तोडणी व वाहतूक (H&T) खर्च वगळून केवळ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष देय असलेल्या एफआरपीचा विचार केल्यास आतापर्यंत 40,327 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत, तर 119 कोटी रुपये अद्याप थकीत आहेत. यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष 99.71 टक्के एफआरपी देण्यात आली आहे.
दरम्यान, 17 साखर कारखान्यांनी 80 ते 99.99 टक्के एफआरपी अदा केली आहे. या कारखान्यांशी संबंधित शेतकरी उर्वरित थकीत रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. 3 साखर कारखान्यांनी 60 ते 80 टक्के एफआरपी अदा केली आहे, तर एका कारखान्याने 59 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिली आहे. राज्यातील 20 साखर कारखान्यांवर साखर आयुक्त कार्यालयाकडून आरआरसी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.


















