कोल्हापूर : आगामी इथेनॉल पुरवठा वर्ष २०२६-२७ साठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास साखर कारखाने व डिस्टिलरींना मनाई केली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने गुरुवारी (ता. २२) यासंदर्भातील आदेश जारी केला. केंद्राच्या या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिसचा वापर करणाऱ्या साखर उद्योगासमोर नवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
१ नोव्हेंबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२७ या कालावधीत बंदी
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, १ नोव्हेंबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२७ या इथेनॉल पुरवठा वर्षात उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसिस या कच्च्या मालापासून इथेनॉल तयार करता येणार नाही. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राने राज्यांच्या उत्पादन शुल्क विभागांना आवश्यक निर्देश देण्यास सांगितले आहे.तसेच, सर्व साखर उत्पादक राज्यांच्या प्रधान सचिव आणि सचिवांना या निर्णयाची माहिती देऊन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कारखाने आणि डिस्टिलरींवर राहणार लक्ष
प्रतिबंधित कच्च्या मालापासून इथेनॉल निर्मिती होणार नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागावर सोपवण्यात आली आहे. संबंधित साखर कारखाने आणि डिस्टिलरींच्या कामकाजावर नियमित लक्ष ठेवून केंद्राच्या आदेशाचे पालन होत असल्याची खात्री करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे आगामी इथेनॉल पुरवठा वर्षात साखर कारखान्यांच्या उत्पादन नियोजनावर आणि इथेनॉल निर्मितीच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


















