इथेनॉल खरेदीवरील बंदी तातडीने मागे घ्यावा : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी

पुणे : केंद्र सरकारने २०२६-२७ या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी उसाचा रस, शुगर सिरप आणि बी-हेवी मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलच्या खरेदीवर घातलेली बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. तसेच, सी-हेवी मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलचा दर प्रतिलिटर ५७.९७ रुपयांवरून ७० रुपये करावा, अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील साखर उद्योगाच्या आर्थिक गणितावर परिणाम होण्याची शक्यता आहे. इथेनॉल खरेदी धोरणातील बदलामुळे साखर कारखान्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याबरोबरच इथेनॉल उत्पादनासाठी उभारलेल्या डिस्टिलरी प्रकल्पांच्या आर्थिक व्यवहार्यतेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

ChiniMandi WhatsApp Channel

इथेनॉल प्रकल्पांतील मोठ्या गुंतवणुकीवर परिणामाची भीती

इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी सुमारे ४० हजार कोटी रुपयांची, तर देशभरात जवळपास एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, असे पाटील यांनी सांगितले. साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीसाठी डिस्टिलरी प्रकल्प उभारले असून, त्यासाठी वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे.

इथेनॉल खरेदी धोरणात अचानक बदल झाल्यास या प्रकल्पांमधून अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. इथेनॉल विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे साखर कारखान्यांच्या आर्थिक नियोजनातील महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे खरेदीवरील निर्बंधांचा परिणाम केवळ डिस्टिलरी विभागापुरता मर्यादित राहणार नाही, तर कारखान्यांची कर्जफेड, आर्थिक स्थैर्य आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत ऊसबिले देण्याच्या क्षमतेवरही होऊ शकतो, असे पाटील यांनी नमूद केले.

सी-हेवी इथेनॉलचा दर ७० रुपये करण्याची मागणी

सी-हेवी मोलॅसिसपासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलचा सध्याचा प्रतिलिटर ५७.९७ रुपये असलेला दर वाढवून ७० रुपये करावा, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. याशिवाय, उसाचा रस, शुगर सिरप आणि बी-हेवी मोलॅसिसपासून उत्पादित इथेनॉलच्या खरेदीवरील बंदीचा निर्णयही मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.

साखर उद्योगाने इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी केलेली गुंतवणूक, घेतलेली कर्जे आणि भविष्यातील उत्पन्नाचे नियोजन लक्षात घेता केंद्र सरकारने आपल्या धोरणाचा पुनर्विचार करावा, अशी भूमिका पाटील यांनी मांडली आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयाकडे साखर उद्योगाचे लक्ष

केंद्र सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, इथेनॉल खरेदी धोरणात बदल होतो का आणि त्याचा आगामी गळीत हंगामातील साखर कारखान्यांच्या आर्थिक नियोजनावर काय परिणाम होतो, याकडे महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.इथेनॉल खरेदीवरील निर्बंध कायम राहिल्यास साखर कारखान्यांच्या उत्पन्नाचे गणित बदलू शकते. त्यामुळे इथेनॉलचे दर आणि खरेदी धोरणाबाबत केंद्र सरकारकडून घेतला जाणारा पुढील निर्णय साखर उद्योगासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here