सांगली : ऊसतोड हंगामाच्या पार्श्वभूमीवर मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कडेगाव वन विभागाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. रामापूर, वांगी आणि परिसरातील ऊसतोड मजुरांच्या वस्त्यांवर जाऊन वन विभागाच्या पथकाने बिबट्यापासून बचाव करण्याचे उपाय सांगत मजूर व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. कडेगाव तालुक्यात सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला असून, विविध गावांमध्ये ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. तालुक्यातील बहुतांश गावे बिबट्याच्या वावराच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. गन्न्याच्या दाट पिकात बिबट्यांना लपण्यासाठी अनुकूल अधिवास मिळत असल्याने या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आढळतो.
ऊसतोडणीमुळे शेतातील पीक कमी होत असताना बिबट्यांच्या हालचालींमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत बिबट्या आणि मनुष्य समोरासमोर येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य हल्ले आणि जीवितहानी टाळण्यासाठी वन विभागाने शेतशिवारांसह ऊसतोड मजुरांच्या वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
बिबट्यापासून बचावासाठी खबरदारीचे आवाहन
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ नुसार बिबट्याचा समावेश अनुसूची-१ मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे बिबट्याला पकडणे किंवा जेरबंद करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेदरम्यान कोणतीही जीवितहानी होऊ नये, तसेच नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, या उद्देशाने वन विभागाकडून व्यापक प्रबोधन केले जात आहे. सांगलीचे उपवनसंरक्षक सागर गवते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे आणि कडेगाव-पलूसचे वनक्षेत्रपाल संदीप खट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत कडेपूर परिमंडळाचे वन अधिकारी सुजित गवते, कडेगाव परिमंडळाचे वन अधिकारी संदीप कुंभार, वनरक्षक रोहन मेसे, माधव मुसळे आणि बचाव पथकाचे सदस्य रामदास वेताळ यांनी रामापूर व वांगी येथील ऊसतोड मजुरांच्या वस्त्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी मजूर आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून बिबट्याच्या वावराच्या वेळी घ्यावयाची काळजी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.ऊसतोड मजूर आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि बिबट्या आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला स्वतःहून पकडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन या जनजागृती मोहिमेद्वारे करण्यात येत आहे.


















