सोलापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्यासाठी ओंकार शुगर समूह प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांचा विश्वास कायम राखण्याला समूहाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन ओंकार शुगर समूहाचे संस्थापक चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रा. लि. युनिट क्रमांक ५ च्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी आयोजित बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मागील गळीत हंगामात ओंकार शुगरला ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना मोफत साखर वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ओंकार शुगर समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस्विनी बरगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा विश्वास जपण्याला प्राधान्य
बाबुराव बोत्रे-पाटील म्हणाले की, ओंकार शुगर समूहाने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास जपण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करणे ही समूहाची भूमिका आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी ऊसदर मिळावा, यासाठी आगामी काळातही प्रयत्न केले जातील.मागील गळीत हंगामाच्या अंतिम टप्प्यात काही शेतकऱ्यांची ऊसबिले अदा करण्यास विलंब झाला होता. याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. शेतकऱ्यांशी असलेले विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी समूह कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी
आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की, सध्या शेतकरी आणि साखर कारखानदार या दोन्ही घटकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कारखानदार आणि व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे.ओंकार शुगरने शेतकऱ्यांची सर्व बिले अदा केल्याची बाब समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. कारखान्याच्या प्रगतीबरोबरच परिसरातील विकासालाही चालना मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नवीन गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मोफत साखर वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देणे आणि त्यांचा विश्वास कायम राखणे, हेच समूहाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जनरल मॅनेजर विठ्ठल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी सन २०२५-२६ मधील गळीत हंगामातील कारखान्याच्या कामगिरीचा आढावा सादर केला.या कार्यक्रमाला डॉ. सागर हिप्परगी, शिवनिंगप्पा अरवत, रामचंद्र अरवत, सुरेश गड्डी, राजकुमार पाटील, परमेश्वर यादवाड, उत्तम वाघमारे, शिवयोगी स्वामी, ऊसतोडणी ठेकेदार अण्णाराव पाटील, बाबूराव करपे, शिवसिद्ध बुळ्ळा यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


















