सातारा : येथील किसनवीर सातारा साखर कारखाना आणि खंडाळा साखर कारखाना या दोन्ही कारखान्यांना, ज्या सभासदांनी ऊस पुरवठा केला आहे, त्यांना प्रत्येकी दहा किलो आणि ज्यांनी ऊस घातलेला नाही, अशा सभासदांना प्रत्येकी पाच किलो साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या बिगरसभासदांचा ऊस गळितासाठी आला आहे, त्यांना प्रत्येकी पाच किलो साखर मिळणार आहे. या साखरेचा दर २० रुपये किलो राहणार आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. कारखान्याचे चेअरमन आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी बॉयलर अग्रिप्रदिपन समारंभात दिलेल्या शब्दानुसार सभासद व बिगर सभासदांना मंगळवार, दि. २७ पासून साखरेचे वाटप करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत कारखान्याच्यावतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात शिंदे यांनी म्हटले आहे की, कारखान्याची जवळपास आठ वर्षांपासून बंद असलेली साखर वाटपाची सुरुवात करुन मंत्री मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड केली आहे. साखर घेण्यासाठी सभासदांनी कारखान्याने दिलेले स्मार्ट कार्ड किंवा आधारकार्ड आणि त्याची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय साखर मिळणार नाही. साखर वाटपाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असून, वाटपाची व्यवस्था संबंधित गट ऑफिसला करण्यात आली आहे. बंद पडलेले साखर वाटप पुन्हा सुरू होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. किसनवीर आणि खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद आणि बिगरसभासदांनी आपला संपूर्ण ऊस आपल्याच कारखान्याला घालून सहकार्य करावे. मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आणि व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, असे शिंदे यांनी या पत्रकात म्हटले आहे.


















