छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर (भवन) येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार आहे. ‘खडकपूर्णा अॅग्रो लिमिटेड’ने १५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या या कारखान्यात आगामी २०२६-२७ गळीत हंगामाची तयारी वेगाने सुरू आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून कारखान्याचा बॉयलर पेटवून प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.
तांत्रिक कारणांमुळे दोन वर्षे कारखाना बंद
२०२१ ते २०२४ या कालावधीत तीन वर्षे यशस्वी गाळप केल्यानंतर तांत्रिक कारणांमुळे हा कारखाना गेली दोन वर्षे बंद होता. कारखाना पुन्हा सुरू करावा, यासाठी साखर कामगार युनियनचे अध्यक्ष हरिदास कळम यांनी कामगारांसह सिद्धेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे आणि खडकपूर्णा अॅग्रोचे अध्यक्ष अनिल गुंजाळ यांची भेट घेतली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत संचालकांनी कारखाना सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला.
स्थानिक युवकांना रोजगाराची संधी
कारखाना सुरू झाल्यामुळे तालुक्यातील युवक, ऊसतोड मजूर, स्थानिक व्यावसायिक तसेच वाहनचालकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यंदा स्थानिक परिसरात उसाचे क्षेत्र कमी असले, तरी बाहेरील भागातून ऊस आणून पुढील दोन ते तीन महिने गाळप हंगाम चालविण्याचे नियोजन आहे. सध्या कारखान्यातील यंत्रसामग्रीची दुरुस्ती आणि देखभालीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. १ नोव्हेंबरपासून गाळप सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज करण्यावर व्यवस्थापनाने भर दिला आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार चालना
खडकपूर्णा अॅग्रो लिमिटेडचे अध्यक्ष अनिल गुंजाळ म्हणाले, “१ नोव्हेंबरपासून गाळप सुरू करण्यासाठी कारखान्यातील यंत्रसामग्रीची दुरुस्ती वेगाने सुरू आहे. कारखाना सुरू झाल्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

















