नवी दिल्ली : सध्या देशात बहुतांश पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळले जाते. ‘ई-२०’ इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल असते. मात्र, केंद्र सरकारने यामध्ये बदल करत पेट्रोलला पर्याय म्हणून शंभर टक्के इथेनॉल वापरणाऱ्या वाहनांचा (फ्लेक्स फ्युएल व्हेइकल) मार्ग मोकळा केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या मान्यतेनंतर, या नियमांची अधिसूचना २३ ऑक्टोबरला जारी करण्यात आली असून, २६ ऑक्टोबरला राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. या नव्या नियमांची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली आहे. ई-१०० इंधनामध्ये जवळपास संपूर्ण इंधन इथेनॉलचे असते. सध्या रस्त्यांवर धावणाऱ्या सामान्य पेट्रोल वाहनांमध्ये; तसेच ‘ई-२०’ इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्येही, योग्य तांत्रिक बदल आणि मान्यतेशिवाय ‘ई-१००’ वापरता येणार नाही.
‘ई-१००’ इंधनाला मान्यता मिळाल्यामुळे अशा इंधनावर चालणारी वाहने विकसित करण्यासाठी वाहन उत्पादकांना नियामक यंत्रणेची चौकट उपलब्ध झाली आहे. काही प्रमुख कंपन्या भारतीय बाजारपेठेसाठी ई-१०० इंधनावर चालणारी वाहने आणण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनविषयक नियमांत बदल करून ‘ई-१००’ इंधनाला मान्यता दिली आहे. यापूर्वी ‘ई-८५’ इंधनाचा पर्याय उपलब्ध होता. ई १०० इंधनाचा वापर विशिष्ट वाहनांतच शक्य आहे. ‘इथेनॉल’ उसासारख्या वनस्पतींपासून तयार केले जाणारे इंधन आहे. ‘ई-१००’ म्हणजे जवळपास शंभर टक्के इथेनॉल असलेले इंधन. या निर्णयामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी वाहन उत्पादकांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. इथेनॉलचे गुणधर्म पेट्रोलपेक्षा वेगळे असल्याने ‘ई-१००’ इंधनासाठी वाहनांच्या इंधनपुरवठा यंत्रणेत आणि इंजिनमध्ये बदल करावे लागतात. इथेनॉलमुळे झीज होऊ नये, यासाठी इंधनवाहिन्यांसह इतर भाग अधिक सक्षम करावे लागतात. इंजिनाच्या नियंत्रण यंत्रणेतही बदल करणे आवश्यक असते.

















