धाराशिव : जिल्ह्यातील गळीत हंगामाला गती मिळाली आहे. जिल्ह्यातील एकूण १४ पैकी ५ कारखान्यांनी प्रत्यक्षात गाळप सुरू केले आहे. यामध्ये २ सहकारी आणि ३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. रविवारअखेर (ता. २५) दोन लाख १ हजार ५८९ टन उसाचे गाळप होऊन एक लाख २६ हजार ७५० क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. सध्या पाच साखर कारखान्यांनी ऊस गाळपास सुरूवात केली असून, अजूनही नऊ कारखाने सुरू होणे बाकी आहेत. या उसाचे गाळप करून एकूण १ लाख २६ हजार ७५० क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. यामध्ये सहकारी कारखान्यांचे १७ हजार २५० क्विंटल, तर खासगी कारखान्यांचे १ लाख ९ हजार ५०० क्विंटल साखर उत्पादन झाले असून जिल्ह्याचा एकूण निव्वळ साखर उतारा ६.२९ टक्के इतका नोंदवला गेला आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात गाळप हंगामात १४ कारखान्यांनी सहभाग घेतला होता. यंदा अद्यापपर्यंत पाच कारखाने सुरू झाले असले तरी अजून नऊ कारखाने सुरू झालेले नाहीत. भैरवनाथ शुगर वर्क्स, ढोकी हा ५ हजार टन दैनिक क्षमता असलेला हा कारखाना १९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला असून, याद्वारे १६ हजार ७०५ टन ऊस गाळप व ९ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. नरसिंह (इंदापूर) सहकारी कारखाना १६ ऑक्टोबरला सुरू झाला असून, याद्वारे ९ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. भैरवनाथ शुगर वर्क्स (सोनारी, ता. परंडा) या खासगी कारखान्याने १८ ऑक्टोबर रोजी गाळप सुरू केले असून ३९,१८४ टन ऊस गाळप केले आहे. कंचेश्वर शुगर लि. (मंगळूर, ता. तुळजापूर) १७ ऑक्टोबरला सुरू झालेल्या या कारखान्याने ५१,४२० टन ऊस गाळप आणि ३६,३०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. नॅचरल शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. (रांजनी, ता. कळंब) १२ ऑक्टोबरला सुरू झालेला हा कारखाना जिल्ह्यातील सर्वाधिक ७७ हजार ७९० टन ऊस गाळप करणारा व ४८ हजार क्विंटल साखर उत्पादन करणारा अग्रेसर कारखाना ठरला आहे.


















