कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि कंपन्यांच्या नफ्यातील वाढ यामुळे भारतीय शेअर बाजाराला उभारी मिळण्याची शक्यता: अहवाल

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्याने होणारी घसरण, कंपन्यांच्या नफ्यातील वाढ आणि समभागांच्या मूल्यांकनाकडे गुंतवणूकदारांचे वाढते लक्ष यामुळे अलीकडील घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराला पुन्हा उभारी मिळू शकते. मात्र, भू-राजकीय अनिश्चितता आणि देशांतर्गत आर्थिक दबावामुळे आगामी काही महिन्यांत बाजारातील वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या संशोधन अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शेअर बाजारातील तेजी परतण्यासाठी तीन प्रमुख घटक

ChiniMandi WhatsApp Channel

शेअर बाजारात पुन्हा तेजी येण्यासाठी अहवालात तीन संभाव्य घटक नमूद करण्यात आले आहेत. त्यामध्ये, इराण-अमेरिका संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आणि कच्च्या तेलाच्या किमती सामान्य पातळीवर येणे. कंपन्यांचे आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले राहणे आणि गुंतवणूकदारांनी अल्पकालीन शेअर किमती आणि गुंतवणूक निधीच्या प्रवाहाऐवजी कंपन्यांच्या मूल्यांकनावर अधिक लक्ष केंद्रित करणे आदीचा समावेश आहे.

अहवालानुसार, भारताच्या सध्याच्या आर्थिक आव्हानांमधून तातडीने दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. शांतता चर्चेतील कोंडी, संघर्ष अधिक तीव्र होण्याचा धोका आणि अपुऱ्या मान्सूनची परिस्थिती यामुळे अर्थव्यवस्थेवर दबाव राहू शकतो.तसेच, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा भारताच्या प्रमुख आर्थिक निर्देशकांवर एका विशिष्ट मर्यादेनंतर असमान प्रमाणात अधिक परिणाम होऊ शकतो, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे.

निफ्टी-५० कंपन्यांच्या नफ्यात १९ टक्क्यांची वाढ

सप्टेंबर तिमाहीच्या आर्थिक निकालांमधून कंपन्यांच्या नफ्याच्या आगामी वाटचालीबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची अपेक्षा आहे.अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंत निकाल जाहीर केलेल्या निफ्टी-५० कंपन्यांच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत १९ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा आकडा विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा १.७ टक्क्यांनी अधिक आहे.याच काळात कंपन्यांच्या व्याज, कर, घसारा आणि अमॉर्टायझेशनपूर्व नफ्यात (EBITDA) १३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.ब्रोकरेजच्या अंदाजानुसार, निफ्टी-५० कंपन्यांचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये १८ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२७-२८ मध्ये १३ टक्क्यांनी वाढू शकतो.

गेल्या काही महिन्यांत कंपन्यांच्या नफ्याच्या अंदाजात मर्यादित कपात झाली असून, पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीतील चांगल्या निकालांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने कायम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बाजारातील घसरणीतून गुंतवणुकीच्या नव्या संधी

अलीकडील बाजारातील घसरणीमुळे अनेक समभागांचे मूल्यांकन अधिक आकर्षक झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे विविध कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणुकीतील संभाव्य जोखीम आणि परतावा यांचे गणित तुलनेने अनुकूल झाले आहे.अलीकडील आठवड्यांमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीनंतर अनेक समभागांच्या किमती आणि त्यांच्या मूलभूत मूल्यांमधील अनुकूल अंतराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वाढल्यास बाजारातील निराशावादी वातावरण कमी होण्यास मदत होऊ शकते, असे अहवालात नमूद केले आहे.

कच्च्या तेलाच्या किमतींवर अर्थव्यवस्थेची दिशा अवलंबून

भारतीय शेअर बाजाराची पुढील वाटचाल मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून राहणार आहे.अहवालातील मूलभूत अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल ९० डॉलर गृहीत धरण्यात आली आहे. या परिस्थितीत भारताचा वास्तविक जीडीपी विकासदर ७.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर सरासरी ग्राहक किंमत महागाई दर ५.२ ते ५.५ टक्क्यांच्या दरम्यान राहू शकतो.दुसरीकडे, प्रतिकूल परिस्थितीत कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल १०५ डॉलरपर्यंत पोहोचल्यास आर्थिक विकासदर घसरून ६.३ ते ६.८ टक्क्यांदरम्यान राहू शकतो. अशा परिस्थितीत महागाई दर ५.५ ते ६ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

बाजारातील तेजी टिकण्यासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास महत्त्वाचा

शेअर बाजारातील सुधारणा दीर्घकाळ टिकण्यासाठी बाह्य आर्थिक दबाव कमी होणे, कंपन्यांच्या नफ्यातील वाढीबाबत विश्वास निर्माण होणे आणि समभागांचे मूल्यांकन आकर्षक राहणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.एकूणच, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये स्थिरता आणि कंपन्यांचे चांगले आर्थिक निकाल भारतीय शेअर बाजाराला आधार देऊ शकतात. मात्र, भू-राजकीय तणाव आणि महागाईचा धोका गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची आव्हाने राहणार आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here