नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिझेलच्या निर्यातीवरील शुल्क १४ रुपये प्रति लिटर आणि विमान इंधनावरील (ATF) शुल्क १२.५० रुपये प्रति लिटर केले आहे. भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम उत्पादनांवरील निर्यात शुल्काचा सरकारकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. गेल्या तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत निर्यात शुल्कात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, डिझेल निर्यातीवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED) ११.५० रुपयांवरून १४ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. तर विमान इंधनावरील शुल्क ११ रुपयांवरून १२.५० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरील शुल्क मात्र शून्यच ठेवण्यात आले आहे. पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED) आणि रस्ता व पायाभूत सुविधा उपकर (RIC) हे दोन्ही शून्य आहेत.
सुधारित दर १६ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. यापूर्वी ३१ ऑक्टोबर रोजी सरकारने डिझेलवरील निर्यात शुल्क ८.५० रुपयांवरून ११.५० रुपये प्रति लिटर आणि विमान इंधनावरील शुल्क १०.५० रुपयांवरून ११ रुपये प्रति लिटर केले होते. त्याचवेळी पेट्रोलच्या निर्यातीवरील २.५० रुपये प्रति लिटर शुल्क रद्द करण्यात आले होते. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोलियम उत्पादनांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि निर्यातीला परावृत्त करण्याच्या उद्देशाने २७ मार्च २०२६ रोजी पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनावरील निर्यात शुल्क लागू करण्यात आले होते.
या शुल्कांचे दर दर पंधरवड्याला तपासले जातात. मागील आढाव्यानंतरच्या कालावधीत कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधन यांच्या आंतरराष्ट्रीय किमतींच्या सरासरीच्या आधारे हे दर निश्चित केले जातात. सरकारने स्पष्ट केले आहे की, अलीकडील बदल केवळ निर्यातीसाठी लागू आहेत. देशांतर्गत वापरासाठी विकल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील विद्यमान उत्पादन शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दर पंधरवड्याला होणाऱ्या या आढावा प्रक्रियेमुळे आंतरराष्ट्रीय इंधन दरांमधील चढ-उतारानुसार केंद्र सरकारला निर्यात शुल्कात बदल करता येतो. त्याचवेळी देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा कायम ठेवण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. (एएनआय)

















