अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने कामगारांना दिवाळीनिमित्त वीस टक्के बोनस देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली. कारखान्याचे अध्यक्ष, आमदार आशुतोष काळे यांनी याची घोषणा केली आहे. दिवंगत कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोक काळे यांनी सदैव ऊस उत्पादक आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य दिले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष या नात्याने आपण ही परंपरा पुढे चालवीत आहोत, असे मत अध्यक्ष काळे यांनी व्यक्त केले. त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार कारखाना कर्मचाऱ्यांच्या १० टक्के पगारवाढीच्या एकूण रकमेची अंमलबजावणी करताना ५० टक्के फरकाची रक्कम ऑगस्ट महिन्यात अदा केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बोनस जाहीर झाल्याने कारखान्याच्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही रक्कम लवकरच कामगारांच्या बँक खात्यात जमा होईल. कामगारांना बोनस म्हणून कारखाना सुमारे साडेपाच कोटी रुपयांचे वितरण करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कामगारांच्यावतीने संघटनेचे जनरल सेक्रेटरी नितीन गुरसळ आणि सेक्रेटरी प्रकाश आवारे यांनी आमदार काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले. यावेळी कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, डिस्टीलरीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाठ, चीफ अकौंटंट वैभव काळे आदी होते.


















