प्रत्येक गाळप हंगामाची सुरुवात एका आशेने होते. कारखान्यांचे बॉयलर पेटतात, कारखान्यांच्या प्रवेशद्वारांवर ऊसवाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या रांगा लागतात आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था नव्या हंगामासाठी सज्ज होते. मात्र, यंदा या आशेचे ओझे नेहमीपेक्षा अधिक जड वाटत आहे. अलीकडेच सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असताना मला हिरवीगार आणि उंच वाढलेली ऊसशेती दिसली. मात्र, हा ऊस अद्याप परिपक्व झालेला नव्हता. कारखान्यांना आवश्यक असलेली साखरेची गोडी आणि उतारा मिळण्यासाठी त्याला आणखी काही आठवड्यांची गरज होती, मात्र तरीही गाळप सुरू झाले आहे.
माझ्या मते, हे चित्र आगामी गाळप हंगामाचे वास्तव स्पष्ट करणारे आहे. 2026-27 चा गाळप हंगाम शेतात, कारखान्यांच्या प्रवेशद्वारांवर आणि जागतिक बाजारपेठेत अशा सर्वच पातळ्यांवर दबावाखाली सुरू होत आहे. अलीकडच्या अनेक हंगामांच्या तुलनेत यंदा सर्वांनाच अधिक दूरदृष्टीने निर्णय घ्यावे लागणार आहेत.
पिकाच्या परिपक्वतेनुसार नव्हे, तर दिनदर्शिकेनुसार ठरणारी हंगामाची सुरुवात
महाराष्ट्राने गाळप हंगामाची सुरुवात 15 ऑक्टोबरपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. पारंपरिक 1 नोव्हेंबरच्या तुलनेत हा निर्णय सुमारे दोन आठवडे आधीचा आहे. केंद्र सरकारनेही राज्यांना याच तारखेपासून गाळप सुरू करण्यास प्रोत्साहन दिले आहे. या निर्णयामागील उद्देश योग्य आणि स्वागतार्ह आहे. दिवाळीपूर्वी बाजारात नवीन साखर उपलब्ध व्हावी, हा त्यामागील प्रमुख हेतू आहे. कारण सध्या देशांतर्गत साखरेचा साठा मर्यादित असून, कारखान्यांमधून विकल्या जाणाऱ्या साखरेचे म्हणजेच एक्स-मिल दरांनी विक्रमी पातळी गाठली आहे.
या निर्णयामुळे यंदा गाळप हंगामाची सुरुवात उसाच्या परिपक्वतेपेक्षा बाजारपेठेच्या गरजा आणि सणासुदीच्या वेळापत्रकानुसार होत असल्याचे दिसते.गाळपाच्या सुरुवातीच्या आठवड्यांत साखर उताऱ्यातील प्रत्येक टक्क्याची घट म्हणजे संपूर्ण हंगामात देशाच्या साखर उत्पादनात होणारी घट होय. अपरिपक्व उसातून प्रतिटन कमी साखर मिळते आणि सुरुवातीला झालेले हे नुकसान नंतर भरून काढता येत नाही.या घाईचा सर्वाधिक भार दोन कमकुवत घटकांवर पडतो. एक म्हणजे साखर कारखाने आणि दुसरे म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 10.25 टक्के मूळ साखर उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल 365 रुपये रास्त व किफायतशीर किंमत (FRP) मंजूर केली आहे. साखर उतारा 9.5 टक्क्यांपेक्षा कमी असला तरी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 338.30 रुपये दराचे संरक्षण मिळते. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही तरतूद योग्यच आहे. मात्र, कमी साखर उतारा देणाऱ्या उसाचे गाळप करणाऱ्या कारखान्यांना प्रत्येक किलो साखरेच्या उत्पादनासाठी अधिक खर्च करावा लागतो. दुसरीकडे, लवकर ऊसतोडणी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे वजन घटते आणि त्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळेच शेतकरी संघटनांनी गाळप हंगाम अतिशय लवकर सुरू करण्यास विरोध केला आहे.
भारताचे साखर उत्पादन आणि मागणी यांचे गणित बदलले
मागील गाळप हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी साखर वळविल्यानंतर भारताचे निव्वळ साखर उत्पादन 280 लाख टन होते. 2026-27 च्या हंगामासाठी AgriMandi.live ने सुमारे 270 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशातून सुमारे 94 लाख टन, महाराष्ट्रातून 90 लाख टन, कर्नाटकातून 48 लाख टन आणि देशातील इतर राज्यांतून 38 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे.
देशांतर्गत साखरेचा वार्षिक वापर सुमारे 285 लाख टन असल्याने उत्पादन आणि मागणी यांच्यात तूट निर्माण होणे जवळपास अटळ आहे.मात्र, उत्पादनाचा हा अंदाज हवामानातील अनिश्चितता आणि प्रत्यक्ष पीक परिस्थितीवर अवलंबून आहे. पावसाचे स्वरूप, उसाची वाढ, पिकाचे आरोग्य आणि साखर उतारा यांवर होणारा परिणाम गाळप हंगाम पुढे सरकल्यानंतर अधिक स्पष्ट होईल. उत्पादन आणि मागणी यांच्यातील ताळेबंद इतका नाजूक असताना उत्पादनातील थोडीशी घटदेखील मोठी समस्या निर्माण करू शकते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आधीच पावले उचलली आहेत. 20 ऑगस्ट रोजी सरकारने टॅरिफ रेट कोटा (TRQ) अंतर्गत 31 ऑक्टोबरपर्यंत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली. 2017-18 नंतर देशांतर्गत वापरासाठी अशा प्रकारची आयात संधी उपलब्ध करून देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासोबतच व्यापारी आणि मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या ग्राहकांवर साठा मर्यादाही लागू करण्यात आल्या.
तथापि, या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. स्वतःची रिफायनिंग क्षमता असलेल्या साखर कारखान्यांना आणि रिफायनर्सना या योजनेचा लाभ घेता येतो. पहिल्या टप्प्यानंतरही दोन लाख टनांहून अधिक आयात कोटा वाटपाविना शिल्लक होता. त्यामुळे कच्च्या साखरेच्या आयातीचा पर्याय परिस्थितीला आवश्यक असलेले प्रमाण उपलब्ध करून देऊ शकलेला नाही.
साखरेचा साठा इतका मर्यादित असताना यंदा इथेनॉल उत्पादनासाठी साखर वळविण्याचीही फारशी मुभा नाही. मागील काही वर्षांत पुरेसा साठा असल्यामुळे डिस्टिलरींकडे वळविलेली साखर आता भारतीय ग्राहकांच्या स्वयंपाकघरांसाठी आवश्यक ठरणार आहे.
सरकारने इथेनॉल पुरवठा वर्ष 2026-27 (ESY 2026-27) मध्ये इथेनॉल उत्पादनासाठी साखर वळविण्याचे प्रमाण शून्यावर आणण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे या वर्षासाठी उसाचा रस, साखर, साखरेचा पाक आणि बी-हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी कोणत्याही निविदा मागविण्यात आलेल्या नाहीत.
जागतिक बाजारपेठ भारतासाठी थांबणार नाही
जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीही भारताला फारसा दिलासा देणारी नाही. AgriMandi.live च्या जागतिक साखर ताळेबंदानुसार, 2026-27 मध्ये जागतिक साखरेची तूट 27 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. या काळातील जागतिक साखर वापर 179.8 दशलक्ष टन असेल, असा अंदाज आहे.
हंगामाच्या अखेरीस साखरेचा जागतिक साठा 8.6 टक्क्यांनी घटून 614 लाख टनांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचा साठा आणि वापर यांचे गुणोत्तर 23.8 टक्क्यांपर्यंत खाली येईल. मागील सात हंगामांच्या तुलनेत हे सर्वांत कमी प्रमाण असेल.
इतर विश्लेषकांचे अंदाजही याच दिशेने आहेत. Barchart च्या वृत्तानुसार, Green Pool ने 2026-27 साठी जागतिक साखर तूट 32.4 लाख टन, तर StoneX ने 9 लाख टन राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्राझीलमधील साखर कारखाने साखरेऐवजी इथेनॉल उत्पादनाकडे अधिक वळत आहेत. त्याचवेळी एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे ब्राझील, भारत आणि थायलंडमधील ऊस उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती आहे.
दुसरीकडे, मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, चीन आणि आग्नेय आशियातील देशही साखरेचे मोठे खरेदीदार म्हणून जागतिक बाजारपेठेत उतरतील. भारताने आयातीसाठी उशीर केला, तर त्याला याच देशांशी साखरेच्या उपलब्ध मालासाठी स्पर्धा करावी लागेल आणि अधिक दर मोजावे लागतील.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेचे दर प्रतिपाऊंड 26 सेंटपर्यंत पोहोचू शकतात. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यास भारताला आयात करून देशात आणलेल्या साखरेचा खर्च आणखी 5 ते 7 टक्क्यांनी वाढू शकतो.\
जागतिक संधी संपण्यापूर्वी 30 ते 40 लाख टन पांढऱ्या साखरेची आयात आवश्यक
याच कारणामुळे माझे ठाम मत आहे की, आगामी हंगामात देशात साखरेचा पुरेसा आणि स्थिर साठा राखण्यासाठी भारताने आता पांढऱ्या साखरेच्या आयातीचा मार्ग खुला करावा. किमान 30 ते 40 लाख टन पांढऱ्या साखरेच्या आयातीचा विचार करणे आवश्यक आहे.सध्या भारतीय बाजारपेठेत साखरेचे दर प्रतिक्विंटल 5,000 ते 5,200 रुपये आहेत. याउलट, आयात करून भारतात साखर आणण्याचा समतुल्य खर्च म्हणजेच इम्पोर्ट पॅरिटी सुमारे 5,500 ते 5,600 रुपये प्रति क्विंटल आहे.
या दोन्ही दरांमधील फरक मोठा वाटू शकतो. मात्र, आयात न करण्याची किंमत त्याहून अधिक महाग ठरू शकते. भारताने आताच साखरेची आयात केली नाही, तर जागतिक बाजारपेठेतील तुटवड्याचा परिणाम अखेरीस देशांतर्गत बाजारपेठेतील दरांवर होईल.साखरेचे दर 70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्यास ग्राहक, साखर उद्योग आणि धोरणकर्ते या सर्वांसमोर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होईल.
आजच निश्चित दरांवर साखर खरेदी करणे म्हणजे भविष्यातील संभाव्य दरवाढीपासून संरक्षण मिळविण्यासाठी विमा उतरविण्यासारखे आहे. याउलट, शेवटच्या क्षणी आयातीसाठी धावपळ करावी लागल्यास अधिक किंमत मोजावी लागू शकते आणि पुरवठ्याची हमीही राहणार नाही.
आता पांढऱ्या साखरेच्या आयातीबाबत निर्णय घेण्याची वेळ
सरकारने यापूर्वीच परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे. कच्च्या साखरेच्या आयातीसाठी उपलब्ध करून दिलेली संधी, साठा मर्यादा आणि उसासाठी निश्चित केलेली एफआरपी हे त्याचेच संकेत आहेत.आता पांढऱ्या साखरेच्या आयातीसाठीही अशीच ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास आणि संभाव्य दरवाढीचा परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते.
ऊसाला परिपक्व होण्यासाठी निसर्गानुसार वेळ लागणारच. मात्र, साखरेची उपलब्धता, बाजारातील स्थैर्य आणि ग्राहकांचे हित जपणारे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारने त्या परिपक्वतेची वाट पाहत बसू नये.जागतिक बाजारपेठेतील आयातीची संधी उपलब्ध असतानाच निर्णय घेणे, हीच आगामी साखर हंगामातील सर्वांत महत्त्वाची गरज आहे.

















