नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) इथेनॉल पुरवठा वर्ष २०२६-२७ (ESY 2026-27) साठी काढलेल्या पहिल्या टप्प्यातील निविदेसाठी बोली सादर करण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबरवरून वाढवून ५ नोव्हेंबर २०२६ केली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, इच्छुक कंपन्यांना आता ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बोली सादर करता येणार आहे. यापूर्वी ही मुदत २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत होती. निविदेची कागदपत्रेही ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहतील. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजून १ मिनिटाने निविदा उघडून त्यांचे मूल्यमापन सुरू केले जाणार आहे.या निविदेसाठी कागदपत्रांची विक्री आणि बोली सादर करण्याची प्रक्रिया १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुरू झाली होती. सुधारित वेळापत्रकात या प्रारंभाच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या निविदेद्वारे तेल विपणन कंपन्या १ नोव्हेंबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२७ या कालावधीसाठी सुमारे १,१०० कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा निश्चित करू इच्छित आहेत.निविदेतील माहितीनुसार, इथेनॉल पुरवठा वर्ष २०२६-२७ साठी इथेनॉल उत्पादनाकरिता साखर वळवण्याचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्देशानुसार तेल विपणन कंपन्यांनी उसाचा रस, साखर, साखरेचा पाक आणि बी-हेवी मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी बोली मागविलेली नाही.त्याऐवजी सी-हेवी मळी, खराब झालेले अन्नधान्य, भारतीय अन्न महामंडळाचा (FCI) अतिरिक्त तांदूळ, मका आणि राष्ट्रीय जैवइंधन धोरणांतर्गत (NPB) परवानगी असलेल्या इतर कच्च्या मालापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.या निविदेमुळे इथेनॉल उत्पादनासाठी विविध कच्च्या मालाचा वापर आणि जैवइंधन पुरवठा व्यवस्थेतील बदलांना महत्त्व प्राप्त झाले आहे.


















