महाराष्ट्र : साखर कारखान्यांना ५०० टनावरील साखर विक्रीचा तपशील ३० ऑक्टोबरपर्यंत द्यावा लागणार

कोल्हापूर : केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने विभागाने बुधवारी जारी केलेल्या आदेशानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ५०० टन किंवा त्यापेक्षा अधिक साखर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा तपशील ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करावे लागणार आहेत. केंद्र सरकारकडून साखर विक्री आणि साठ्याच्या नोंदींवर वाढते लक्ष ठेवले जात असताना, कारखान्यांनी सादर केलेल्या माहितीची अचूकता महत्त्वाची ठरणार आहे. ३० ऑक्टोबरची मुदत जवळ आल्याने साखर कारखान्यांसमोर विक्रीच्या नोंदी अद्ययावत करून संपूर्ण तपशील सादर करण्याचे आव्हान आहे. कारखान्यांना विहित नमुन्यात साखर कारखान्याचे नाव, प्रकल्पाचे नाव व प्रकल्प क्रमांक, मोठ्या ग्राहकाचा वस्तू व सेवा कर (जीएसटी) क्रमांक, ग्राहकाचे नाव आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये संबंधित ग्राहकाला विकलेल्या साखरेचे एकूण प्रमाण अशी माहिती सादर करावी लागणार आहे.

केंद्र सरकारने साखर कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणातील साखर विक्रीचा तपशील सादर करण्यात टाळाटाळ होत असल्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेचा पुरवठा आणि बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी कारखान्यांना पुन्हा निर्देश दिले आहेत. साखरेची विक्री नेमकी कोणाला, किती प्रमाणात आणि कोणत्या माध्यमातून झाली, याची अचूक माहिती केंद्र सरकारला मिळावी, हा या निर्देशांचा प्रमुख उद्देश आहे. मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा तपशील उपलब्ध झाल्याने बाजारातील साखरेचा प्रवाह, उपलब्ध साठा आणि विक्री व्यवहारांवर देखरेख ठेवणे सरकारला शक्य होणार आहे. यामध्ये कारखान्यांकडून थेट ग्राहकांना केलेल्या विक्रीबरोबरच एजंट किंवा व्यापाऱ्यांमार्फत झालेल्या विक्रीचाही समावेश आहे. दरम्यान, अनेक कारखान्यांनी अद्याप आवश्यक माहिती सादर केलेली नाही. काही कारखान्यांनी दिलेली माहिती अपूर्ण अथवा चुकीची असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे केंद्राने माहिती सादर करण्याच्या प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई न करण्याचे निर्देश दिले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here