सहकारी साखर कारखान्यांना मोठा आर्थिक दिलासा! सॉफ्ट लोनच्या नियमांत महत्त्वाचे बदल; एनसीडीसीच्या कर्जाचीही करता येणार परतफेड

मुंबई : राज्यातील आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सहकारी साखर कारखान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सॉफ्ट लोन योजनेच्या अटींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, आता राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) घेतलेल्या कर्जावरील व्याजही अनुदानासाठी पात्र ठरणार आहे. यामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दैनिक ‘अॅग्रोवन’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

याशिवाय, सॉफ्ट लोन योजना जाहीर होण्यापूर्वी एफआरपी अदा करण्यासाठी किंवा गळीत हंगामाच्या पूर्वतयारीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेडही या योजनेतून करता येणार आहे. त्यासाठी सॉफ्ट लोनमधून मिळणारा निधी संबंधित जुन्या कर्जखात्यांवर किंवा खेळत्या भांडवलाच्या कर्जखात्यांवर वर्ग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, काही व्यावसायिक देणी भागविण्यासाठीही निधी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. सहकार विभागाने यासंदर्भात शुद्धिपत्रक जारी केले असून, योजनेच्या अंमलबजावणीत एनसीडीसीचाही समावेश करण्यात आला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

कारखाना संघाच्या मागणीनंतर शासनाचा निर्णय

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना २०२५-२६ च्या गळीत हंगामातील थकीत एफआरपी अदा करण्यासाठी तसेच २०२६-२७ च्या हंगामपूर्व तयारीसाठी सॉफ्ट लोन योजना मंजूर करण्यात आली होती.मात्र, ही योजना जाहीर होण्यापूर्वीच अनेक कारखान्यांनी बँका आणि वित्तीय संस्थांकडून गॅप लोन, हंगामपूर्व कर्ज तसेच अल्प व मध्यम मुदतीची कर्जे घेतली होती. या कर्जाच्या माध्यमातून एफआरपीची रक्कम अदा करणे, कारखान्यांची दुरुस्ती व देखभाल, हंगामी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि ऊसतोडणी व वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम देणे अशा खर्चांची पूर्तता करण्यात आली होती.त्यामुळे सॉफ्ट लोनमधून मिळणाऱ्या निधीचा वापर नेमका कोणत्या कारणांसाठी करता येईल, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केली होती. साखर आयुक्तांनीही यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर सरकारने योजनेच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.

जुन्या कर्जाची परतफेड करण्याचा मार्ग मोकळा

शासनाच्या सुधारित निर्णयातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे सॉफ्ट लोन योजनेपूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास देण्यात आलेली परवानगी.२२ सप्टेंबर २०२६ रोजीचा शासन निर्णय जारी होण्यापूर्वी एफआरपी अदा करण्यासाठी किंवा हंगामपूर्व आवश्यक खर्च भागविण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड आता सॉफ्ट लोनच्या रकमेतून करता येणार आहे. यासाठी संबंधित निधी जुन्या कर्जखात्यात किंवा खेळत्या भांडवलाच्या कर्जखात्यात वर्ग करता येईल.मात्र, ही सवलत ठरावीक कारणांसाठी घेतलेल्या जुन्या कर्जाच्या परतफेडीपुरतीच मर्यादित राहणार आहे. सॉफ्ट लोनच्या निधीचा इतर कोणत्याही कारणासाठी किंवा असंबंधित व्यावसायिक कामासाठी वापर करता येणार नाही.

३० नोव्हेंबरपर्यंत मंजूर कर्जावरील व्याजाला अनुदान

सुधारित नियमांनुसार, बँका किंवा राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांनी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सहकारी साखर कारखान्यांना मंजूर करून वितरित केलेली कर्जरक्कम व्याज अनुदानासाठी पात्र ठरणार आहे.या योजनेचा लाभ केवळ सहकारी साखर कारखान्यांनाच मिळणार असून, खासगी साखर कारखान्यांना या व्याज अनुदानाचा लाभ घेता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

एफआरपी देण्याला प्रथम प्राधान्य

सॉफ्ट लोन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा विनियोग करताना २०२५-२६ च्या गळीत हंगामातील थकीत एफआरपी अदा करण्याला प्राधान्य देणे बंधनकारक आहे.एखाद्या कारखान्याची एफआरपी थकीत नसेल, तर त्याला या कर्जाचा वापर २०२६-२७ च्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीसाठी करता येणार आहे. तसेच, १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झालेल्या चालू गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची एफआरपी अदा करण्यासाठीही या कर्जाचा वापर करता येणार आहे. सॉफ्ट लोन योजनेच्या अटींमध्ये करण्यात आलेल्या या सुधारणांमुळे सहकारी साखर कारखान्यांना जुन्या कर्जाचा भार कमी करण्यास, व्याजाचा खर्च मर्यादित ठेवण्यास आणि शेतकऱ्यांची एफआरपी वेळेत अदा करण्यास मदत होणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here