य. मो. कृष्णा कारखान्याच्या ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर; सुरक्षित वाहतुकीसाठी विशेष उपक्रम

सातारा : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने विशेष सुरक्षा उपक्रम राबविण्यात आला. कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर विभागाचे पोलीस निरीक्षक चेतन चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज बाबर, सहाय्यक पोलीस फौजदार सचिन चव्हाण, कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव आणि व्यवस्थापकीय संचालक बाजीराव सुतार उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

यावेळी बोलताना अध्यक्ष सुरेश भोसले म्हणाले की, रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. वाहन चालविताना वेगमर्यादेचे भान ठेवावे. अतिवेगाने वाहन चालविणे तसेच वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे टाळले पाहिजे. वेगावर नियंत्रण आणि वाहतुकीतील शिस्त यामुळे अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होते.

रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांचे पालन करण्यापुरती मर्यादित नसून प्रत्येक वाहनचालकाची सामाजिक जबाबदारी आहे. स्वतःच्या तसेच इतरांच्या कुटुंबाचा विचार करून प्रत्येकाने सुरक्षितपणे वाहन चालवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

व्यवस्थापकीय संचालक बाजीराव सुतार म्हणाले की, सर्व वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या उपक्रमावेळी कारखान्याचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here