तेहरान : इराण सरकारने मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय जहाजांना या महत्त्वाच्या सागरी मार्गावरून कोणत्याही अडथळ्याशिवाय ये-जा करता येणार आहे. इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे उपाध्यक्ष अहमद हयात-मोगद्दम यांनी सांगितले की, या सागरी मार्गावरून प्रवास करण्यासंदर्भातील निर्बंधांमधून काही देशांना सूट देण्यात आली आहे. भारत, चीन, इराक आणि कतार या देशांची जहाजे कोणत्याही मर्यादेशिवाय या जलमार्गातून प्रवास करू शकतात.
आर्थिक आणि सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत बोलताना हयात-मोगद्दम म्हणाले, “होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाबतीत आम्ही आधीच चार देशांना ‘माफ’ केले आहे. सध्या भारत, चीन, इराक आणि कतार या देशांना सूट आहे. आमच्या दृष्टिकोनातून त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अमेरिकेलाही त्यांच्या बाबतीत कोणतीही अडचण नाही. ही जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ये-जा करत आहेत. शेवटी आम्ही व्यापारच करत आहोत, नाही का?” ते पुढे म्हणाले, “भारतीयांसाठी आम्ही ही सवलत दिली आहे, जेणेकरून आम्हाला औषधांची आयात करता येईल. चीनलाही आम्ही ही सवलत दिली आहे, जेणेकरून आम्हाला त्यांच्याकडून राजकीय पाठिंबा मिळू शकेल. अर्थात, आम्ही त्यांच्याकडून पैसेही घेतो. म्हणजेच, त्यांच्याकडून आर्थिक मोबदलाही घेतला जातो.”
अमेरिकेसोबत संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कतारच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचे प्रयत्न
दरम्यान, अमेरिकेसोबत संभाव्य संघर्षाचे सावट असताना इराणमधील वरिष्ठ अधिकारी देशाच्या लष्करी नेतृत्वाला कतारच्या मध्यस्थीने पुढे आलेल्या कराराच्या प्रस्तावाचा विचार करण्याचा आग्रह करत आहेत.’अल अरबिया’च्या वृत्तानुसार, इराणमधील सध्याच्या अंतर्गत आढाव्यांमध्ये अमेरिकेसोबत पुन्हा थेट युद्ध सुरू होण्याची शक्यता ही तेहरानसमोरील सर्वाधिक संभाव्य परिस्थिती मानली जात आहे. लष्करी पातळीवरील या गंभीर अंदाजांनंतरही इराणमधील वरिष्ठ राजकीय नेते राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्यासाठी सक्रिय प्रयत्न करत आहेत.
सूत्रांच्या हवाल्याने ‘अल अरबिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ आणि परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी देशाच्या लष्करी नेतृत्वाला कतारच्या मध्यस्थांनी सादर केलेल्या प्रस्तावावर सकारात्मक आणि रचनात्मक पद्धतीने विचार करण्याचा ठाम सल्ला दिला आहे. संघर्ष थांबवणे हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश आहे.
वृत्तानुसार, कतारचे दूत अलीकडेच थेट तेहरानमध्ये दाखल झाले होते. त्यांना मर्यादित आणि स्पष्ट स्वरूपाची जबाबदारी देण्यात आली होती. चर्चेच्या अनेक फेऱ्या घेण्याऐवजी, प्रस्तावित आराखड्याबाबत इराणची अधिकृत आणि अंतिम भूमिका जाणून घेणे, हाच त्यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. राजकीय नेते राजनैतिक चर्चेचा मार्ग खुला ठेवण्याचा प्रयत्न करत असताना, इराणमधील लष्करी रणनीतीकार मात्र शांतता टिकून राहण्याबाबत साशंक आहेत. अमेरिकन सैन्यासोबत पुन्हा सक्रिय संघर्ष सुरू होण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.


















