बेंगळूरू : कर्नाटक राज्यात करण्यात आलेल्या तपासणीत पाचपैकी चार पेट्रोल पंपांवर निर्धारित 20 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री रिझवान अर्शद यांनी ही माहिती दिली. ‘द हिंदू’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मंत्री रिझवान अर्शद यांनी शुक्रवारी सांगितले की, तेल विपणन कंपन्यांकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणाची माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे राज्य सरकारने विविध जिल्ह्यांमधून पेट्रोलचे 63 नमुने गोळा करून ते तपासणीसाठी प्रमाणित खासगी प्रयोगशाळेत पाठवले होते.
E20 पेट्रोलच्या अंमलबजावणीदरम्यान धक्कादायक निष्कर्ष
भारताने 2025 मध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांतर्गत देशभरात E20 पेट्रोलचा वापर वाढविण्यास सुरुवात केली. कच्च्या तेलाची आयात कमी करणे, प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन घटवणे तसेच देशांतर्गत इथेनॉल उत्पादकांना प्रोत्साहन देणे हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. मात्र, कर्नाटकातील तपासणीत समोर आलेल्या निष्कर्षांमुळे इंधनाची गुणवत्ता, वाहनांची अनुकूलता आणि वाहनांच्या मायलेजविषयी चिंता वाढण्याची शक्यता आहे. देशभरात E20 पेट्रोलची विक्री वाढल्यानंतर विरोधी पक्ष आणि वाहनचालकांकडून या मुद्द्यांवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
20 टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉल मिश्रणाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेत वेगवेगळे संकेत
पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा अधिक इथेनॉल मिश्रण करण्याच्या शक्यतेवर केंद्र सरकारकडून वेगवेगळी विधाने करण्यात आली आहेत.केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी जून महिन्यात सांगितले होते की, फ्लेक्स-फ्युएल वाहनांसाठी भारतात टप्प्याटप्प्याने E85 पेट्रोल उपलब्ध करून दिले जाईल. या पेट्रोलमध्ये 85 टक्के इथेनॉल असेल.मात्र, त्यानंतर एका महिन्याने पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सध्याच्या 20 टक्क्यांच्या पातळीवरून वाढविण्याची सरकारची तातडीची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले होते.
केंद्र सरकारच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा
कर्नाटकातील पेट्रोल नमुन्यांच्या तपासणीबाबत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडे प्रतिक्रिया मागण्यात आली होती. मात्र, यावर मंत्रालयाकडून तातडीने कोणतेही उत्तर मिळालेले नाही.या प्रकरणामुळे पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण, इंधनाची गुणवत्ता आणि वाहनांच्या कार्यक्षमतेवर होणारे संभाव्य परिणाम याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

















