नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) चार किंवा त्याहून अधिक पदरी राष्ट्रीय महामार्गांवर बॅरियरमुक्त टोल वसुलीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना आगामी तसेच सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना लागू असतील. या व्यवस्थेमुळे टोल नाक्यांवर वाहने न थांबवता टोल वसुली करणे शक्य होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमाचा उद्देश टोल नाक्यांवरील वाहनांच्या रांगा आणि प्रतीक्षा वेळ कमी करणे, इंधनाचा वापर घटवणे तसेच महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत करणे हा आहे.
मंत्रालयाने सांगितले की, “या मार्गदर्शक सूचनांमध्ये टोल प्लाझाची रचना, लेनची मांडणी, गॅन्ट्री, रस्त्यांची पायाभूत सुविधा, प्रकाश व्यवस्था, दिशादर्शक फलक आणि पूरक सुविधांसाठी एकसमान निकष निश्चित करण्यात आले आहेत.” धोरणात्मक परिपत्रकात राष्ट्रीय महामार्गांच्या विविध प्रकारांनुसार बॅरियरमुक्त टोल प्लाझाचे प्रमाणित आराखडे निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये टोल लेनची संख्या, गॅन्ट्रीची जागा आणि रस्ता सुरक्षा विषयक पायाभूत सुविधांचा समावेश आहे. मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, प्रत्यक्ष बॅरियरवर वाहने न थांबवता टोल वसुली होणार असल्याने पारंपरिक टोल नाक्यांच्या तुलनेत आवश्यक लेनची संख्या तर्कसंगत करण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध जागेचा अधिक कार्यक्षम वापर करता येईल आणि टोल क्षेत्रातून वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत होईल.
नवीन आणि सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये मार्गदर्शक सूचना लागू
या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयाने स्पष्ट केले की, सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याच्या टप्प्यावर असलेल्या प्रकल्पांमध्ये नवीन डिझाइनविषयक निकषांचा समावेश केला जाईल. यापूर्वीच कंत्राट देण्यात आलेल्या किंवा बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये संबंधित करारातील तरतुदींनुसार हे बदल लागू केले जातील. NHAI च्या क्षेत्रीय कार्यालयांना आगामी प्रकल्पांमध्ये निर्धारित निकषांचा समावेश करण्याचे तसेच सुरू असलेल्या प्रकल्पांमध्येही त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रस्ता सुरक्षा आणि प्रवाशांच्या सुविधांवर भर
मार्गदर्शक सूचनांमध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था, वाहनचालकांना आगाऊ माहिती आणि महामार्ग वापरकर्त्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, टोल प्लाझावरील दृश्यमानता वाढवणे, वाहनचालकांना टोल क्षेत्राची माहिती देणे आणि वाहनांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य दिशादर्शक फलक तसेच इलेक्ट्रॉनिक व्हेरिएबल मेसेज साइन (VMS) बसविण्यात येणार आहेत. याशिवाय, टोल प्लाझाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासकीय इमारती, देखभाल केंद्रे आणि संचालन व देखभालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचीही तरतूद करण्यात आली आहे.
यापूर्वी हाय-स्पीड राष्ट्रीय महामार्गांसाठीही मार्गदर्शक सूचना
यापूर्वी NHAI ने एक्स्प्रेसवे वगळता इतर हाय-स्पीड अॅक्सेस-कंट्रोल्ड राष्ट्रीय महामार्गांचे नियोजन आणि डिझाइन तयार करण्यासाठी व्यापक मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.आगामी हाय-स्पीड महामार्ग कॉरिडॉरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करताना एकसमानता आणणे, तांत्रिक निकषांमध्ये सुसंगतता राखणे आणि रस्ता सुरक्षा अधिक मजबूत करणे हा त्या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश होता.मंत्रालयाने म्हटले आहे की, मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) टोल प्लाझासाठी प्रमाणित डिझाइन व्यवस्था ही देशभरात एकसमान बॅरियरमुक्त टोल पायाभूत सुविधा उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे देशातील टोल वसुली व्यवस्थेची एकूण कार्यक्षमता सुधारण्यास मदत होणार आहे.

















